‘बीएमएस’ परीक्षा : पेपरफुटीप्रकरणी दहा अटकेत, कॉलेजचा कर्मचारी मुख्य आरोपी, सहा विद्यार्थ्यांचाही समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 03:02 AM2017-11-18T03:02:06+5:302017-11-18T03:02:59+5:30
बीएमएस अभ्यासक्रमाच्या ‘ई-कॉमर्स अॅण्ड डिजिटल मार्केटिंग’ या विषयाची प्रश्नपत्रिका गुरुवारी फुटल्याने सर्वत्र खळबळ उडाली होती. माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक आणि त्यांच्या पथकाने
गौरी टेंबकर-कलगुटकर
मुंबई : बीएमएस अभ्यासक्रमाच्या ‘ई-कॉमर्स अॅण्ड डिजिटल मार्केटिंग’ या विषयाची प्रश्नपत्रिका गुरुवारी फुटल्याने सर्वत्र खळबळ उडाली होती. माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक आणि त्यांच्या पथकाने पेपर फोडणा-या आणि ते विद्यार्थ्यांना विकणा-या टोळीचा अवघ्या चोवीस तासांत पर्दाफाश केला. या प्रकरणी कॉलेजमधील एका कर्मचा-यासह दहा जणांना अंबोली पोलिसांनी अटक केली. यात सहा विद्यार्थी आहेत.
बीएमएसच्या तिस-या वर्षाच्या पाचव्या सत्राच्या परीक्षेदरम्यान गुरुवारी हा प्रकार घडला. या प्रकरणी मुंबई विद्यापीठाने अंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कल्पेश बागुल हा यातील मुख्य आरोपी आहे. तो कांदिवलीच्या निर्मल कॉलेजमध्ये टेक्निकल हेड आहे. तो रोज सकाळी साडेनऊच्या सुमारास कॉलेजला जाऊन पेपर डाऊनलोड करायचा. त्यानंतर त्यातील एक प्रत फोल्डर बनवून त्यात ठेवून नंतर ती ई-मेलने संबंधित विद्यार्थ्यांना पाठवत असे. हे अत्यंत संवेदनशील प्रकरण असल्याने त्याचा तपास पोलीस उपायुक्त परमजीतसिंग दहिया आणि अंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दया नायक, सहायक पोलीस निरीक्षक पवार, पोलीस निरीक्षक गजानन सरगर आणि कमळकर या पथकाने सुरू केला. सर्वात प्रथम बागुलला अटक करण्यात आली. त्यानंतर त्याच्याच चौकशीतून मिळालेल्या माहितीनुसार आणखी नऊ जणांना अटक करण्यात आली. यातील सहा विद्यार्थी असून एक आरोपी शेअर मार्केटमध्ये काम करणारा आहे. बागुलच्या अटकेनंतर पोलिसांनी ज्या नऊ जणांना ताब्यात घेतले त्यांच्याकडून नऊ मोबाइल, संगणक, डीव्हीआर तसेच प्रिंटर पोलिसांनी हस्तगत केले आहेत.
त्या मुलीचीदेखील चौकशी-
गुरुवारी परीक्षेदरम्यान अंधेरीच्या एमव्हीएम कॉलेज आॅफ कॉमर्स अँड सायन्समध्ये एका विद्यार्थिनीच्या मोबाइलवर पेपर असल्याचे उघडकीस आले. व्हॉट्सअॅपच्या माध्यमाने पेपर व्हायरल झाला होता. या प्रकरणी त्या मुलीचीदेखील चौकशी होणार आहे. चौकशीनंतर त्या मुलीवर गुन्हा नोंद होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
नऊ पेपर फोडले : एकूण नऊ पेपर फोडल्याचे बागुल याने पोलिसांना सांगितले आहे. यात बीएमएसचे चार पेपर आहेत. बागूल २००८ पासून कॉलेजमध्ये कार्यरत आहे. पेपर नेमका कुठून फुटला याबाबत ‘व्होटर प्रिंट कोड’मार्फत विद्यापीठाला समजले होते. ज्याची माहिती ते शुक्रवारी दहा वाजता निर्मल कॉलेजला देणार होते. मात्र सकाळी साडेसात वाजताच नायक यांनी बागुलच्या मुसक्या आवळल्या.
दोन हजारांना विकले पेपर : बागुलने ई-मेलने पाठविलेले पेपर अवघ्या दोन ते पाच हजारांना विकले. ते ज्या सहा मुलांनी विकले त्यांनी स्वत:ही त्याचा वापर केल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.
विद्यापीठाने नेमली एक सदस्यीय समिती
मुंबई : बीएमएसचा पेपर फुटल्याचे उघडकीस आल्यानंतर, या पेपरफुटी प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विद्यापीठाने शुक्रवारी एक सदस्यीय समितीची नेमणूक केली आहे.