Join us

बीएमएस सत्र सहाची परीक्षा आजपासून, सात जिल्ह्यांत १५७ केंद्रे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2019 5:23 AM

१५ हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी; परीक्षा, मूल्यमापन विभागाची माहिती

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या २०१९ च्या उन्हाळी सत्राची तृतीय वर्ष बीएमएस सत्र ६ ची परीक्षा गुरुवार, २ मेपासून सुरू होत असून ती ९ मेपर्यंत चालणार आहे. १५,२३० विद्यार्थी ही परीक्षा देतील. यात विद्यार्थिनींची संख्या ६,६१९ इतकी आहे. सात जिल्ह्यांतील १५७ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होत असल्याची माहिती मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन विभागाने दिली.

मुंबईसह, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व पालघर या जिल्ह्यांतील व महाराष्ट्राबाहेरील दादरा-नगर हवेली येथील एका केंद्रासह एकूण १५७ परीक्षा केंद्रांवर या परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. सात जिल्ह्यांतून सर्वांत जास्त विद्यार्थी मुंबई जिल्ह्यातून बसत असून त्यांची संख्या ४,७९२ इतकी आहे. यातील मुलांची संख्या सर्वाधिक २,८१६ आहे. मुंबई शहर, मुंबई उपनगर व ठाणे अशा तिन्ही जिल्ह्यांत मिळून ही संख्या १३,५६४ असून एकूण विद्यार्थ्यांपैकी ८९.०६% विद्यार्थी या तीन जिल्ह्यांतून परीक्षा देतील. तसेच महाराष्ट्राबाहेर दादरा-नगर हवेली या केंद्र्रशासित प्रदेशातील सिल्वासा या केंदावर १३ विद्यार्थी या परीक्षेस बसत असून त्या सर्व विद्यार्थिनी आहेत.

या परीक्षेचा कालावधी अडीच तासांचा असून परीक्षा सकाळी १०.३० वाजता सुरू होणार असून दुपारी १.०० वाजता संपणार असल्याची माहिती परीक्षा विभागाने दिली. त्यामुळे विद्यार्थ्यांनी वेळेवर परीक्षेसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन मुंबई विद्यापीठाच्या वतीने करण्यात आले आहे.

परीक्षेसाठी परीक्षा विभागातील हस्तलिखित विभाग, परीक्षा व निकाल विभाग, कॅप विभाग व संगणक विभागातील अधिकारी व सर्व कर्मचाऱ्यांनी तयारी केली आहे. या वेळी परीक्षा वेळेवर सुरू करून निकाल वेळेवर जाहीर करण्यास विद्यापीठाचे प्राधान्य राहील. - डॉ. विनोद पाटील, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ

टॅग्स :मुंबई विद्यापीठपरीक्षा