लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दहावीचा निकाल जाहीर करण्याआधी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून प्रचलित पद्धतीप्रमाणे एक दिवस आधी त्यासंदर्भातील सूचना जाहीर केली जाईल आणि माहिती अधिकृत संकेतस्थळावरही दिली जाईल. तेव्हा विद्यार्थी पालकांनी सोशल मीडियावर फिरणाऱ्या चुकीच्या मेसेजवर विश्वास न ठेवण्याची विनंती राज्य शिक्षण मंडळाकडून करण्यात आली आहे.
१५ जुलैपर्यंत राज्य शिक्षण मंडळाचा दहावीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर १५ जुलै रोजी दहावीचा निकाल जाहीर होणार असे चुकीचे संदेश सोशल मीडियावर फिरत असल्याने राज्य शिक्षण मंडळाकडून हे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
दहावीच्या निकालाचे सर्वच कामकाज आटोक्यात आलेले आहे. काही थोड्याशा त्रुटी राहिलेल्या आहेत, त्या कुठेही राहू नये यासाठी त्या दुरूस्त करण्याचे काम वेगाने सुरू आहे. त्यामुळे आठवडाभरातच दहावीचा निकाल जाहीर केला जाईल अशी माहिती राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी दिली.
राज्य शिक्षण मंडळाकडून निकालपत्रक तयार करण्यासाठी मंडळाच्या नऊ विभागीय मंडळात कामकाज आटोक्यात आल्याचा दावा केला जात आहे. मात्र अद्याप अनेक विभागीय मंडळातील निकालांचे काही अंशी काम अपूर्ण आहे. विशेषतः जे विद्यार्थी संपर्कात नाहीत, किंवा खाजगीरित्या प्रविष्ट झालेले विद्यार्थी ज्यांचे मागील निकाल मिळण्यात अडचणी होत आहेत अशा विद्यार्थ्यांच्या निकालाचे काम अपूर्ण असल्याची माहिती मिळत आहे. आता या निकालांवर राज्य शिक्षण मंडळाकडून कार्यवाही सुरु असून लवकरच दहावीचा निकाल अपेक्षित असल्याचे सांगितले जात आहे.