विद्यार्थी, पालकांची मागणी; कोरोना संक्रमण वाढीचा पालकांना धसका
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे विद्यार्थी, पालक धास्तावले आहेत. दहावी, बारावीच्या परीक्षांवरही पुन्हा संकट ओढावले आहे. रुग्णवाढीमुळे अनेक राज्यातील शाळा पुन्हा बंद करण्यात आल्या आहेत. रुग्णवाढीचा आलेख असाच राहिल्यास दोन दिवसांआधी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या इयत्ता दहावी व बारावीच्या लेखी परीक्षांच्या संभाव्य वेळापत्रकावर संकट उद्भवण्याची भीती शिक्षण मंडळातील अधिकारी व्यक्त करत आहेत. पालकांची धास्तीही यामुळे वाढली असून परीक्षा झाल्या तर त्या ऑनलाइन घ्याव्यात अशी मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा प्रथमच परीक्षा फेब्रुवारी-मार्चऐवजी एप्रिल-मे या कालावधीत होणार आहे. बारावीची लेखी परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे २०२१ या कालावधीत, तर दहावीची लेखी परीक्षा २९ एप्रिल ते २० मे या कालावधीत होणार आहे. मात्र, मागील आठ दिवसांपासून राज्यात काेरोना रुग्णांच्या संख्येत रोज वाढ होत आहे. त्यामुळे लाखांत विद्यार्थीसंख्या असणाऱ्या दहावी, बारावीच्या ऑफलाइन परीक्षांचे नियोजन, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून शिक्षण मंडळाकडून कसे केले जाणार, यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
यासंदर्भात राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाशी संपर्क साधला असता, परीक्षा पद्धती सध्या बदलणे शक्य नाही. वाढत्या रुग्णसंख्येचा आढावा आम्ही घेत आहोत. शाळांकडूनही माहिती मागवत आहोत आणि त्याप्रमाणे आयोजन करत आहोत. मात्र सध्या काहीही प्रतिक्रिया किंवा निर्णय देणे योग्य ठरणार नसल्याची माहिती मंडळाचे सचिव अशोक बॉसला यांनी दिली.
* * * * * * * * * *... तर विद्यार्थ्यांवरील ताण कमी झाला असता
कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येने वेळापत्रकात बदल झाल्यास विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे नियोजन बिघडणार आहे. शिवाय लेखी परीक्षा तीन तासांची असल्याने ऑफलाइन परीक्षेत संक्रमणाच्या भीतीने पालक चिंतीत होऊन ऑनलाइन परीक्षांची मागणी करू लागले आहेत. वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर प्रचलित पद्धतीपेक्षा ऑनलाइन, ऑफलाइन, संमिश्र परीक्षा पद्धती, अंतर्गत मूल्यमापनाचा विचार यंदाच्या वर्षासाठी बोर्डाने केला असता तर विद्यार्थ्यांवरील ताण कमी झाला असता असे मत समुपदेशक शिलक जयवंत कुलकर्णी यांनी व्यक्त केले
-------------------.