मुंबई - अभ्युदय बँकेच्या प्रशासनाचा कारभार ढिसाळ असल्याच्या मुद्यावरून भारतीय रिझर्व्ह बँकेने अभ्युदय बँकेचे संचालक मंडळ १२ महिन्यांसाठी बरखास्त केले आहे. तसेच बँकेवर प्रशासकाची नियुक्ती केली आहे. बँकेचे संचालक मंडळ जरी बरखास्त करण्यात आले असले तरी, बँकेच्या दैनंदिन व्यवहारावर कोणतेही निर्बंध लादले नसल्याचे शिखर बँकेने स्पष्ट केले आहे.
रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या निवेदनानुसार, स्टेट बँकेचे माजी मुख्य सरव्यवस्थापक सत्य प्रकाश पाठक यांची प्रशासक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्या मदतीसाठी एका सल्लागार समिती देखील स्थापन करण्यात आली असून त्यामध्ये, स्टेट बँकेचे माजी सरव्यवस्थापक वेंकटेश हेगडे, चार्टर्ड अकाऊटंट महेन्द्र छाजेड, कॉसमॉस बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक सुहास गोखले यांची नेमणूक करण्यात आली आहे.