Join us

वांद्रे आणि माहीम किल्ल्याला जोडणारा बोर्ड वाॅक मुंबईचे नवीन आकर्षण ठरेल : आदित्य ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 4:07 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईतील वांद्रे किल्ला आणि माहीम किल्ला या दोन ठिकाणांना जोडणारा प्रस्तावित बोर्ड वॉक कम ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबईतील वांद्रे किल्ला आणि माहीम किल्ला या दोन ठिकाणांना जोडणारा प्रस्तावित बोर्ड वॉक कम सायकल ट्रॅक प्रकल्प हा मुंबईतील नवीन आकर्षण ठरणार असल्याचे सांगतानाच या प्रकल्पासाठी संबंधित सर्व यंत्रणांनी योग्य ते सहकार्य करावे, असे निर्देश राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी सोमवारी या संदर्भातील बैठकीत दिले.

या प्रस्तावित प्रकल्पाचा आराखडा तयार करण्याच्या दृष्टीने मंत्री ठाकरे यांनी साेमवारी ऑनलाइन आढावा बैठक घेतली. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त पी. वेलरासू, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष राधेश्याम मोपलवार, महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित सैनी, महानगरपालिकेच्या जी / उत्तर विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर या बैठकीत सहभागी झाले होते. प्राथमिक संकल्पनेनुसार हा प्रकल्प सुमारे ४.७७ किलोमीटर लांबीचा राहणार आहे. यामध्ये पादचारी मार्गिका आणि सायकल ट्रॅकही असणार आहेत. प्रस्तावित बोर्ड वॉकसाठी अंतिम आराखडा आणि प्रस्ताव लवकरात लवकर सादर करण्याचे निर्देश मंत्री ठाकरे यांनी यावेळी दिले.

प्राथमिक संकल्पनेवर सर्व संबंधित यंत्रणांनी चर्चा करून आपापल्या अखत्यारितील मुद्द्याविषयी स्पष्टता करावी. जेणेकरून अंतिम आराखडा तयार करताना त्यांचा समावेश करता येईल. माहीमकडील बाजूस या प्रकल्पाची बांधणी करताना माहीम कोळीवाडा वसाहतीला तसेच तेथील मच्छिमार बांधवांच्या बोटींना कोणताही अडथळा ठरणार नाही यादृष्टीने हा बोर्ड वॉक बांधण्यात येईल. त्यासोबत वांद्रे-वरळी सागरी सेतू आंतरमार्ग बदलाच्या ठिकाणी (इंटरचेंज) देखील बोर्ड वॉकला अडथळा येणार नाही याची दक्षता घेतली जाणार आहे. त्यादृष्टीने संपूर्ण विचार करून सर्व यंत्रणांनी समन्वय साधून सूचना केल्यानंतर अंतिम आराखडा तयार केला जाईल, असे ठाकरे म्हणाले.