मुंबई : शिवस्मारकाच्या बांधकामाचा प्रारंभ करण्यासाठी निघालेल्या स्पीड बोटीचा अपघात झाला. या अपघातात बोटीमधून बेपत्ता झालेल्या सिद्धेश पवार या तरुणाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. स्पीड बोट खडकावर आदळल्याने हा अपघात झाला.
शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्यासह कंत्राटदार, शासकीय अधिकारी आणि कर्मचारी स्पीड बोटींनी अरबी समुद्रामध्ये निघाले. मात्र, त्यांच्यातील एक स्पीड बोट खडकावर आदळली आणि बोटीत अचानक पाणी शिरल्याने हाहाकार उडाला. तीनपैकी एका स्पीड बोटीमध्ये अधिकारी, कर्मचारी आणि कार्यकर्ते होते.
अपघात झालेल्या स्पीड बोटीत पाणी वाढू लागल्याने सगळेजण घाबरले. मात्र, तेवढ्यात रेस्क्यू बोट घटनास्थळी आली आणि बुडत असलेल्या स्पीड बोटीतील लोकांना आपल्या बोटीत घेतले. अपघातग्रस्त स्पीड बोटीत एकूण 25 जण होते. मात्र, यापैकी 24 जणांना वाचवण्यात यश आले असून सिद्धेश पवार या तरुणाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, या दुर्घटनेमुळे शिवस्मारकाच्या पायाभरणीचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.