गेट वे ऑफ इंडिया येथून निघालेल्या फेरीबोटीला एलिफंटाकडे जाताना अपघात झाला होता. बोटीने जलसमाधी घेतल्याने प्रवासी बुडाले होते. ९९ प्रवाशांना वाचवण्यात यश आले, तर १३ जणांचा मृत्यू झाला. यात अजूनही काही जण बेपत्ता असून, शोध सुरू आहे. या बोटीतून प्रवास करत असलेले हन्साराम भाटी हे अद्यापही बेपत्ता आहे. त्यांच्याबद्दल काहीच माहिती मिळत नसल्याने कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली.
बुधवारी म्हणजे १८ डिसेंबर रोजी गेट वे ऑफ इंडिया येथून एलिफंटाकडे जात असलेल्या फेरीबोटीला नौदलाच्या स्पीड बोटीने धडक दिली. त्यामुळे फेरीबोट कलंडली आणि बुडाली. फेरीबोट बुडाली त्यावेळी बोटीत शंभराहून अधिक प्रवासी आणि कर्मचारी होते.
हन्साराम भाटी बेपत्ता, कुटुंबीयांची पोलीस ठाण्यात तक्रार
अपघात होऊन समुद्रात बुडालेल्या फेरीबोटीतून हन्साराम भाटी हे प्रवास करत होते. त्यांच्याबद्दल अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. भाटी यांच्याबद्दल आता त्यांच्या कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. भाटी यांच्या कुटुंबीयांनी कुलाबा पोलीस ठाण्यात याबद्दलची माहिती दिली.
शोध मोहीम अजूनही सुरूच
दुर्घटनेपासून हाती घेण्यात आलेली शोध मोहीम गुरूवारीही सुरूच ठेवण्यात आली. नौदलाच्या बोटी, तटरक्षक दल, सागरी पोलीस, हेलिकॉप्टर्स यांच्या मदतीने ही शोध मोहीम सुरू आहे. दोन व्यक्ती अद्यापही बेपत्ता असून, त्याचा शोध घेण्यात दुपारपर्यंत यश आलेलं नव्हतं.
मृतांची नावे
फेरीबोट अपघातात निधिश अहिरे, राकेश अहिरे, हर्षदा अहिरे, माही पावरा, शफीना पठणा, प्रवीण शर्मा, मंगेश केळशीकर, मोहम्मद कुरेशी, रमा रती गुप्ता, महेंद्रसिंग शेखावत, प्रज्ञा कांबळे, टी दीपक (नौदल), दीपक वाघचौरे यांचा मृत्यू झाला आहे.