Join us

लाटांच्या माऱ्यामुळे भाऊच्या धक्क्यावर बोट बुडाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 4:07 AM

मुंबई : चक्रीवादळामुळे समुद्रकिनाऱ्यावर धडकणाऱ्या लाटांच्या तडाख्याने दुपारच्या सुमारास भाऊच्या धक्क्यावर उभी करून ठेवलेली बाेट बुडाली.अरबी समुद्रात तयार ...

मुंबई : चक्रीवादळामुळे समुद्रकिनाऱ्यावर धडकणाऱ्या लाटांच्या तडाख्याने दुपारच्या सुमारास भाऊच्या धक्क्यावर उभी करून ठेवलेली बाेट बुडाली.

अरबी समुद्रात तयार झालेल्या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर कोणीही समुद्रात न उतरण्याच्या सूचना बंदर व्यवस्थापनाने केल्या आहेत. त्यामुळे फेरीबोटी, मच्छिमार बोटी, खासगी नौका आणि बार्ज किनाऱ्यावर नांगरून ठेवण्यात आल्या. कुर्मी कंपनीची खासगी स्पीड बोट भाऊच्या धक्क्यावर उभी करण्यात आली होती. लाटांच्या माऱ्यामुळे ती बंदराच्या कडांना धडकत होती. एकाहून एक जोरदार धडकेमुळे बोटीचा काही भाग फुटला आणि त्यातून पाणी आत गेले. बोटीत पाणी वाढल्यामुळे वजन सहन न झाल्याने ती कलंडली आणि बुडाली, अशी माहिती भाऊच्या धक्क्यावरील सूत्रांनी दिली.

वादळाची तीव्रता वाढल्यामुळे या बोटीला बुडण्यापासून वाचविता आले नाही. शिवाय लाटांचा मारा मोठ्या प्रमाणात असल्याने समुद्रात प्रवेश करणे धोकादायक होते. बोटीत माणसे नसल्यामुळे हा धोका कोणी पत्करायला तयार नसल्याचे सूत्रांनी सांगितले. बोट कोणाच्या मालकीची होती याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. दरम्यान, यासंदर्भात बंदर व्यवस्थापनाशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

.......

(फोटोओळ – लाटांच्या माऱ्याने भाऊच्या धक्क्यावर बोट बुडाली.)