- पाच महिन्यांपासून अनधिकृतरीत्या उभी; बंदरांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : भाऊच्या धक्क्यावर नांगरून ठेवलेली बोट तौक्ते चक्रीवादळाच्या तडाक्यामुळे बुडाली. मात्र, ही बोट परदेशातील असून गेल्या पाच महिन्यांपासून येथे अनधिकृतपणे उभी होती, अशी माहिती समोर आली आहे.
‘ईपीसी एंजल’ असे या बोटीचे नाव असून, पश्चिम आफ्रिकेतील लायबेरिया राष्ट्राचा ध्वज तिच्यावर होता. या बोटीची नोंदणीही याच देशातील असून, मुंबई पोर्ट ट्रस्ट किंवा अन्य कोणत्याही अधिकृत शासकीय कार्यालयाच्या परवानगीविना ती भाऊच्या धक्क्यावर उभी करण्यात आली होती, अशी माहिती सूत्रांनी दिली.
मुंबई पोर्ट ट्रस्टच्या नियमानुसार कोणतेही परदेशी जहाज भाऊच्या धक्क्यावर उभे करता येत नाही. अशा जहाजांच्या संचलनासाठी विशेष नियमावली तयार करण्यात आली आहे. मग ही बोट तेथे पोहोचली कशी, पोर्ट ट्रस्टच्या अधिकाऱ्यांनी कागदपत्रे तपासली नव्हती का, भाऊच्या धक्क्यावर लागणाऱ्या बोटींवर कोणाचेही नियंत्रण नाही का, असे सवाल महाराष्ट्र नवनिर्माण नाविक सेनेने उपस्थित केले आहेत.
‘ईपीसी एंजल’ बोट भाऊच्या धक्क्यावर उभी केल्यापासून तिचे मालक वा कर्मचारी येथे फिरकलेले नाहीत. नोंदणी परदेशातील असली तरी भारतातील कोणी व्यक्ती ती हाताळत असल्याचे कळते. सुरक्षात्मक खबरदारी न घेतल्याने तौक्ते चक्रीवादळात या बोटीला जलसमाधी मिळाली. अद्यापही ती बाहेर काढण्यात आलेली नाही. बोटीतील इंधन पाण्यात मिसळल्याने परिसरातील सागरी परिसंस्थेवर विपरीत परिणाम झाला आहे.
या प्रकरणाची तातडीने दाखल घेऊन तपास सुरू करावा, तसेच बोटीचा मालक, कर्मचाऱ्यांची चौकशी करून बोट भाऊच्या धक्क्यावर पोहोचली कशी याचा शोध घ्यावा. संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण नाविक सेनेने केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष आणि यलो गेट पोलीस ठाण्याच्या प्रमुखांना निवेदन दिले आहे. याबाबत मुंबई पोर्ट ट्रस्टशी संबंधित अधिकाऱ्यांशी संवाद साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
* अधिकारी फिरकलेच नाहीत!
२६/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतरही बंदरांच्या सुरक्षेकडे गांभीर्याने पाहिले जात नाही हे, धक्कादायक आहे. परदेशी बोट पाच महिने धक्क्यावर उभी होती, पण कोणी तपासणी केली नाही. बोट बुडाल्यानंतरही अधिकारी फिरकले नाहीत.
- निशांत गायकवाड, कार्याध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण नाविक सेना.
* कार्यवाहीचे अधिकार मुंबई पाेर्ट ट्रस्टला
आम्ही घटनेची नोंद करून घेतली आहे, पण हा विषय मुंबई पोर्ट ट्रस्टच्या अखत्यारित येत असल्याने पुढील कार्यवाही त्यांनाच करावी लागेल. बोटी अनधिकृतरीत्या उभ्या केल्यास दंडात्मक कारवाईचा अधिकारही त्यांनाच आहे.
- सुहास हेमाडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, यलो गेट पोलीस ठाणे.
------------------------