मुंबई : अजून पावसाचे आगमन झाले नसले तरी, राज्यात १० जूनपासूनच मासेमारी पूर्णपणे बंद झाली आहे. वेसावे, मढ, भाटी, मालवणी, मनोरी, गोराई, जुहू, खारदांडा, माहीम, वरळी, कुलाबा, माहूल या मुंबईच्या विविध कोळीवाड्यांत मासेमारी आणि संबंधित व्यवसाय पूर्णपणे बंद झाले आहेत. शासनाच्या मत्स्यव्यवसाय खात्याच्या आदेशाप्रमाणे १० जून ते १५ आॅगस्ट किंवा नारळीपौर्णिमा असा मासेमारी बंदीचा कलावधी असतो. या काळात समुद्र खवळलेला असल्यामुळे जीवितहानी होण्याची शक्यता असते. विशेष म्हणजे हा माश्यांचा प्रजननाचा काळ असल्यामुळे राज्यात मासेमारी पूर्णपणे बंद असते.यंदा नारळीपौर्णिमा १० आॅगस्टला येत असल्यामुळे तब्बल दोन महिन्यांच्या सक्तीच्या विश्रांतीनंतर राज्यातील मासेमारी सुरू होणार असल्याची माहिती महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे मुंबई अध्यक्ष किरण कोळी यांनी दिली. मत्स्यसंवर्धनाचा विचार करून मढ कोळीवाड्यातील ९० टक्के मासेमारी १ जूनपासूनच बंद झाली होती. आता उर्वरित नौकादेखील १० जूनपूर्वी मढच्या बंदरावर शाकारल्या असल्याची माहिती त्यांनी दिली.मत्स्यसंवर्धनासाठी १५ मेपासूनच मासेमारी बंदीचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार ठाणे जिल्ह्यात संपूर्ण मासेमारी गेल्या १५ मेपासूनच बंद झाली होती, अशी माहिती समितीचे प्रदेश सरचिटणीस नरेंद्र पाटील आणि सचिव रामकृष्ण तांडेल यांनी दिली. (प्रतिनिधी)
नौका शाकारल्या
By admin | Published: June 13, 2014 1:56 AM