लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मुंबईवरून एलिफंटा, मांडवा, जेएनपीटीला जाण्यासाठी बोट पकडायची असेल तर गेटवे ऑफ इंडियाऐवजी रेडिओ क्लब येथे जावे लागणार आहे. मुंबई सागरी मंडळ रेडिओ क्लबजवळ नव्या जेट्टीचे बांधकाम करणार आहे. त्यामुळे गेट वे ऑफ इंडिया फक्त पर्यटकांसाठीच असेल.
जेट्टीच्या बांधकामासाठी परवानग्या मिळाल्या असून, कंत्राटदाराचीही नियुक्ती करण्यात अली आहे. अडीच वर्षांत बांधकाम पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे गेटवे ऑफ इंडिया जवळ होणारी गर्दी कमी होईल.
गेटवे ऑफ इंडिया इथल्या जेट्टीवरून दरवर्षी सुमारे ३० ते ३५ लाख प्रवासी वाहतूक केली जाते. गेटवे ऑफ इंडिया ही ऐतिहासिक वास्तू असल्याने ती पाहण्यासाठी लाखो पर्यटक भेट देतात. त्यामुळे पर्यटक आणि प्रवाशांची अशी गर्दी होते. तेथील जेट्टीवर एकावेळेस फक्त पाच बोटींची बर्थिंग (बोट पार्किंग) करता येत असल्याने प्रवाशांना ताटकळावे लागते. तसेच येथून जिने उतरून जावे लागत असल्याने बोटीमध्ये चढणे-उतरणे जिकिरीचे बनते. यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळ २२९ कोटी २८ लाख रुपये खर्च करून नवी जेट्टी उभारणार आहे.
जेट्टीची वैशिष्ट्ये
एकूण क्षेत्रफळ २५,१४८ चौ. मीटर ११,९५१ चौ. मीटर बर्थिंग एरिया एकाचवेळी २० बोटी उभ्या करण्याची सोय टर्मिनल प्लॅटफॉर्म रुंदी - ८० बाय ८० मीटर जेट्टी - २१४ मीटर लांब आणि १२ मीटर रुंद बर्थिंग जेट्टी ( १० प्लॅटफॉर्म्स ) - ३८.७ मी × ७.५ मी सुरक्षा तपासणी क्षेत्र, वेटिंग एरिया, टॉयलेट, पाणपोई अग्नी सुरक्षा प्रणाली, सीसीटीव्ही कॅमेरे ३५० लोकांची क्षमता असलेले ॲम्फीथिएटर. संरक्षण भिंतीपासून जेट्टीची पूर्ण लांबी ६५० मीटर सागरमाला योजने अंतर्गत प्रकल्पाचे बांधकाम केंद्र आणि राज्य शासनाची ५०-५० टक्के भागीदारी