मुंबईतील अँटॉप हिल परिसरात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका निर्जनस्थळी बंद पडलेल्या कारमध्ये दोन चिमुकल्यांचे मृतदेह आढळून आले आहेत. सख्ख्या बहिण-भावाच्या मृत्यूमुळे अँटॉप हिल परिसरात खळबळ उडाली. कारमध्ये अडकून पडल्याने श्वास गुदमरुन दोघांचा मृत्यू झालाचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साजिद मोहम्मद शेख (७), मुस्कान शेख (५) हे दोघंही बुधवारी दुपारपासून बेपत्ता होते. त्यांच्या कुटुंबीयांनी दोघांना शोधण्याचा खूप प्रयत्न केला मात्र त्यांचा शोध लागला नाही. अखेर संध्याकाळी पालकांनी अँटॉप हिल पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी परिसर पिंजून काढला असता रात्रीच्या सुमारात घरापासून अवघ्या ५० मीटरवर उभ्या असलेल्या एका भंगारातील कारमध्ये दोघं बेशुद्ध अवस्थेत आढळून आले.
दोघांनाही तातडीनं सायन रुग्णालयात नेण्यात आलं. पण तोवर बराच उशीर झाला होता. डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषीत केलं. मुलं खेळता खेळता कारमध्ये बसली आणि कार लॉक झाल्याने दोघांचा गुदमरुन मृत्यू झाला असावा असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. सदर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. अँटॉप हिल पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.