महापालिका घेणार बोगस लॅबचा शोध

By admin | Published: January 30, 2015 03:14 AM2015-01-30T03:14:11+5:302015-01-30T03:14:11+5:30

मुंबईच्या गल्लोगल्लीत ठाण मांडून बसलेल्या बोगस पॅथॉलॉजी लॅबचे पितळ ‘लोकमत’ने उघड केल्याने महापालिकेने

BODOS Lab Search | महापालिका घेणार बोगस लॅबचा शोध

महापालिका घेणार बोगस लॅबचा शोध

Next

मुंबई : मुंबईच्या गल्लोगल्लीत ठाण मांडून बसलेल्या बोगस पॅथॉलॉजी लॅबचे पितळ ‘लोकमत’ने उघड केल्याने महापालिकेनेही या काळाबाजाराची गंभीर दखल घेतली असून बेकायदा लॅबची शोधमोहीम पालिकेने हाती घेतली आहे़
रक्त चाचणी करणारे हात प्रशिक्षित आहेत की नाही हे न जाणताच रुग्ण पॅथॉलॉजीची पायरी चढतात़ यामुळे रुग्णाचे किती नुकसान होते व या आड कसा काळाबाजार सुरू आहे हे ‘लोकमत’ने उघड केल्यानंतर सर्वसामान्यांच्या पायाखालची जमीनच सरकली़ याने प्रशासनही थक्क झाले़ पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी तर बोगस पॅथॉलॉजीचा शोध घेणार असल्याची ग्वाही लोकमतला दिली़
ते म्हणाले, मुंबईत अनेक पॅथॉलॉजी लॅब या डिप्लोमा इन मेडिकल लॅब टेक्निशियनचा (डीएमएलटी) अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या व्यक्ती स्वतंत्रपणे चालवत आहेत. ही अत्यंत गंभीर बाब आहे. नियामप्रमाणे या व्यक्तींना लॅब चालवता येत नाही. लोकमतने केलेल्या मेगा स्टिंग आॅपरेशननंतर, नियमाचे उल्लंघन करणाऱ्या पॅथॉलॉजी लॅबचा शोध घ्यायला सुरुवात करणार आहे़ दोषी लॅबवर कारवाई केली जाईल़ तर कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांना पॅथॉलॉजी लॅबविषयी चौकशी करण्याचे आदेश देण्यात येणार असल्याचे सांगितले़ (प्रतिनिधी)

> कठोर शासन झालेच पाहिजे

वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर पॅथॉलॉजीसाठी पदव्युत्तर शिक्षण घेतल्यावरच त्या व्यक्तींना रिपोर्ट देण्याची परवानगी दिली जाते. टेक्निकल बाबींचे शिक्षण घेतलेल्या व्यक्तीला वैद्यकीय ज्ञान नसते, यामुळे त्यांनी रिपोर्ट देणे हे १०० टक्के चुकीचे आहे. या रिपोर्टमुळे रुग्णांना चुकीचे औषधोपचार होतात आणि त्यांचा मृत्यू होऊ शकतो. यामुळे यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. या गोष्टीला आळा घालणे अत्यंत गरजेचे आहे.
- डॉ. तात्याराव लहाने,
अधिष्ठाता, जे.जे. रुग्णालय

> ताबडतोब टाळे ठोका

ज्या व्यक्तींना वैद्यकीय ज्ञान नाही, अशा व्यक्तींनी पॅथॉलॉजी लॅब स्वतंत्रपणे चालवणे हे योग्य नाही. या सर्व लॅब ताबडतोब बंद झाल्या पाहिजेत. टेक्निकल अभ्यासक्रम करणाऱ्या व्यक्ती रिपोर्ट आॅनलाइन करू शकत नाहीत. त्यांचे काम हे फक्त नमुने घेणे आणि प्रोसेस करणे इतकेच असते. यापुढे पॅथॉलॉजीचे पदव्युत्तर शिक्षण घेतलेला डॉक्टरच रिपोर्ट अ‍ॅनलाइन करून देऊ शकतो. रुग्णांचे निदान हे अचूकच व्हायला हवे, यासाठी हे घडणारे प्रकार बंद होणे गरजेचे आहे.
- डॉ. सुहासिनी नागदा,
संचालिका, वैद्यकीय शिक्षण आणि प्रमुख रुग्णालये (महापालिका)

Web Title: BODOS Lab Search

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.