मुंबई : बांधकाम साइटवर काम करत असताना सहका-याचा मुलुंडमध्ये डम्परखाली चिरडून मृत्यू झाला. अटकेच्या भीतीने मृतदेह काळाचौकी परिसरातील पदपथावर ठेवला. त्यावर चादर पांघरून तो झोपला असल्याचे भासवल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी काळाचौकी पोलिसांनी चौकडीला बेड्या ठोकल्या आहेत.काळाचौकी येथील झकेरिया बंदर रोड परिसरात ९ जानेवारीला एका इसमाचा मृतदेह आढळून आला. घटनेची वर्दी मिळताच काळाचौकी पोलीस तेथे दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेत या प्रकरणी अनोळखी इसमाविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला. मोहम्मद मन्सुरी (४०) असे मत इसमाचे नाव असून तो मूळचा बिहारचा रहिवासी आहे.या गुन्ह्याचा उलगडा करण्यासाठी तपास अधिकारी एस. खांडेकर यांनी परिसरातील सीसीटीव्ही फूटेज ताब्यात घेतले. त्यातीलच एका फूटेजमध्ये काही इसम मन्सुरीला पदपथावर ठेवत असल्याचे दिसून आले. याच फूटेजच्या आधारे खांडेकर यांनी आरोपींचा शोध सुरू केला आणि मुंबई सेंट्रल येथून चार जणांना ताब्यात घेतले. रणधीर राधा प्रसाद सिंग (२८), ब्रिजेश सोनकर (२८), मयाराम रामपाल (४०), मुंगेरीलाल मिट्टू केवट (५५) अशी चौघांची नावे आहेत. मन्सुरी हा सिंग, सोनकर, केवट, रामपाल यांच्यासोबत माती वाहण्याचे काम करत होता. ९ जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास मुलुंड पूर्वेकडील बांधकाम साइटवर पाचही जण एकत्र काम करत होते. डम्परमध्ये माल भरून झाल्यानंतर ते निघाले. मन्सुरीही गाडीत बसल्याचा अंदाज बांधत डम्पर चालकाने गाडी मागे घेतली. त्यात खाली उभा मन्सुरी गाडीखाली चिरडला गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. चालकाने अन्य कामगारांनाही अटकेची भीती दाखवली. यातूनच मृतदेहाची विल्हेवाट लावून पसार होण्याचे चौघांनी ठरविले. घटनेच्याच रात्री मृतदेह काळाचौकी परिसरात ठेवून ते निघून गेल्याची कबुली त्यांनी पोलिसांना दिली आहे.
अटकेच्या भीतीने मृतदेह ठेवला भिका-यांच्या रांगेत, चौघांना बेड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 4:56 AM