शिवडीतल्या रेल्वे रुळावर सापडला अंडरवर्ल्ड डॉनच्या मुलाचा मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2017 02:05 PM2017-10-03T14:05:59+5:302017-10-03T14:14:25+5:30

एकेकाळी मुंबई अंडवर्ल्डमधील बडे प्रस्थ असलेल्या चंद्रकांत खोपडेचा मुलगा गीतेश खोपडे सोमवारी शिवडीतील रेल्वे रुळावर मृतावस्थेत सापडला.

The body of the boy underworld don was found on the railway track in Sewri | शिवडीतल्या रेल्वे रुळावर सापडला अंडरवर्ल्ड डॉनच्या मुलाचा मृतदेह

शिवडीतल्या रेल्वे रुळावर सापडला अंडरवर्ल्ड डॉनच्या मुलाचा मृतदेह

googlenewsNext
ठळक मुद्दे  रेल्वे पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून, हा अपघात होता कि, आत्महत्या ते अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांना गीतेशजवळ कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही.

मुंबई - एकेकाळी मुंबई अंडवर्ल्डमधील बडे प्रस्थ असलेल्या चंद्रकांत खोपडेचा मुलगा गीतेश खोपडे सोमवारी शिवडीतील रेल्वे रुळावर मृतावस्थेत सापडला. गीतेश फक्त 32 वर्षांचा होता. चंद्रकांत ऊर्फ बाब्या खोपडेच्या गोल्डन गँगने एकेकाळी मुंबई अंडरवर्ल्डमध्ये चांगलाच धुमाकूळ घातला होता. लोअर परेलच्या सन मिल कपांऊडमधून बाब्या खोपडे आपली गोल्डन गँग चालवायचा. हाजी मस्तान, वरदाजन मुदलीयार या अंडरवर्ल्ड डॉनना त्याकाळी गोल्डन गँग संरक्षण द्यायची. 

गीतेश वडाळयाला राहत होता.  रेल्वे पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून, हा अपघात होता कि, आत्महत्या ते अद्याप स्पष्ट झालेले नाही. रात्री 12.15 च्या सुमारास स्टेशन मॅनेजरला एक व्यक्ती जखमी अवस्थेत लेव्हल क्रॉसिंगवर पडली असल्याची माहिती मिळाली. स्टेशन मॅनेजरने रेल्वे पोलिसांना माहिती दिल्यानंतर त्याला तात्काळ सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले. रात्री 1.15 च्या सुमारास रुग्णालयाने गीतेशला मृत घोषित केले. पोलिसांना गीतेशजवळ कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही. पोलीस या घटनेच्या प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराच्या शोधात आहेत. 

रेल्वे पोलिसांनी सध्या अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. गीतेश रेल्वे रुळ ओलांडत असतानाही अपघात झाला असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. रेल्वे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे हे प्रकरण असून वेगवेगळया अंगाने तपास सुरु आहे. गीतेश युवा सेनेचा माजी सदस्य होता. दिवंगत पत्रकार जे.डे. यांनी मुंबई अंडरवर्ल्डवर 'खल्लास ए टू झे' पुस्तक लिहीले होते. 

या पुस्तकानुसार चंद्रकांत ऊर्फ बाब्या खोपडेची गोल्डन गँग 1966 ते 1990 दरम्यान सक्रीय होती. या गँगमधील सदस्यांच्या अंगावर सोन्याचे दागिने असायचे. त्यांचा पेहराव चटकन नजरेत भरायचा. त्यावरुन त्यांना गोल्डन गँग हे नाव पडले. प्रतिस्पर्धी डायमंड गँगबरोबर त्यांचे कट्टर शूत्रत्व होते. बाब्या लोअर परेलच्या सन मिल कपांऊडमधून आपली गँग चालवायचा. औद्योगिक वाद सोडवण्यासाठी, कामगार युनियनवर दबाव आणण्यासाठी मिलचा मालकवर्ग या गँगचा वापर करायचा. 

दादर, प्रभादेवी, गिरगाव आणि लालबाग भागात गोल्डन गँगचे जुगाराचे अड्डे होते. त्यातून ही टोळी पैसा उभारायची. 70-80च्या दशकात ही टोळी सक्रीय होती. त्यावेळी महिना गोल्डन गँगचे उत्पन्न 25 लाख होते अशी माहिती या पुस्तकात आहे. आता गोल्डन गँगचे अस्तित्व संपुष्टात आले आहे. 

Web Title: The body of the boy underworld don was found on the railway track in Sewri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Murderखून