Join us

सावित्री नदीच्या पात्रात आढळला पुण्यातील व्यावसायिकाचा मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2021 4:06 AM

महाड : महाड- पंढरपूर मार्गावर शनिवारी सावित्री नदीपात्रात एक मृतदेह आढळला असून सदर मृतदेह पिंपरी चिंचवड येथील एका व्यावसायिकाचा ...

महाड : महाड- पंढरपूर मार्गावर शनिवारी सावित्री नदीपात्रात एक मृतदेह आढळला असून सदर मृतदेह पिंपरी चिंचवड येथील एका व्यावसायिकाचा असल्याचे निष्पन्न झाले आहे. आनंद उणवणे (४५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

पिंपरी चिंचवड येथे तो एफ एफ चिटफंड नावाने व्यवसाय करीत होता. तीन-चार दिवसांपूर्वी त्याने आपल्या मॅनेजरला खात्यातून ४० लाख रुपये काढून ड्रायव्हर करवी आपल्या घरी पाठविण्यास सांगितले होते. त्यानंतर तो बेपत्ता झाला होता. ४० लाख रुपयांची रक्कम आणि घरातील काही दागिने देखील गायब झाले आहेत. या प्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांकडे तक्रार दाखल आहे. महाड येथे अनोळखी मृतदेह आढळून आल्याची आणि मृताचे वर्णन आनंद उणवणे यांच्याशी मिळते जुळते आढळून आल्यानंतर उणवणे यांचे कुटुंबीय आणि पिंपरी चिंचवड पोलीस महाड येथे आले.

कुटुंबीयांनी ओळख पटविल्यानंतर मृतदेह त्यांच्या ताब्यात देण्यात आला. व्यावसायिक वाद किंवा खंडणी प्रकरणातून उणवणे यांचा खून करण्यात आला असावा अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. महाड आणि पिंपरी चिंचवड पोलीस या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.