‘बॉडी गार्ड’ पोलिसांना नेत्यांचा सहवास सोडवेना!, मूळ कर्तव्याचा पडला विसर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2019 01:06 AM2019-02-11T01:06:32+5:302019-02-11T01:07:36+5:30

मुंबईसह राज्यातील विविध मंत्री व नेत्यांकडे नियुक्तीला असलेल्या २०० वर ‘बॉडी गार्ड’ (संरक्षक) पोलीस त्यांच्या प्रतिनियुक्तीची मुदत उलटून गेल्यानंतरही त्यांच्याकडे कार्यरत आहेत.

the 'Body Guard' police forget about the original duty | ‘बॉडी गार्ड’ पोलिसांना नेत्यांचा सहवास सोडवेना!, मूळ कर्तव्याचा पडला विसर

‘बॉडी गार्ड’ पोलिसांना नेत्यांचा सहवास सोडवेना!, मूळ कर्तव्याचा पडला विसर

Next

- जमीर काझी

मुंबई : मुंबईसह राज्यातील विविध मंत्री व नेत्यांकडे नियुक्तीला असलेल्या २०० वर ‘बॉडी गार्ड’ (संरक्षक) पोलीस त्यांच्या प्रतिनियुक्तीची मुदत उलटून गेल्यानंतरही त्यांच्याकडे कार्यरत आहेत. पोलिसांचे नित्याचे काम न करता, कसल्याही श्रमाविना सफारीत मिरवून ‘मेवा’ चाखित आहे. त्यामुळे त्यांना मूळच्या कर्तव्याचा विसर पडून राजकीय नेत्यांचा सहवास सुटेनासा झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
राज्यातील प्रत्येक महत्त्वपूर्ण घडामोडीकडे बारकाईने लक्ष ठेवण्याची जबाबदारी असलेल्या राज्य गुप्तवार्ता विभागाचेही (एसआयडी) आपल्या विशेष संरक्षक शाखेतील (एसपीयू) या ‘बॉडी गार्ड पोलिसांकडे दुर्लक्ष झाले आहे. आयुक्त व विशेष महानिरीक्षक लोकसभा निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्यामुळे त्याचा विसर पडला आहे. त्यामुळे या ठिकाणी प्रतिनियुक्तीसाठी चार महिन्यांपूर्वी मैदानी चाचणी देऊनही त्यांची निवड न केल्याने, दीड हजारांहून अधिक इच्छुक उमेदवारांत नाराजीचे वातावरण आहे.
महाराष्टÑातील केंद्रीय मंत्री व राज्य सरकारातील मुख्यमंत्र्यांसह विविध मंत्री, आमदार, खासदार व महत्त्वाच्या नेत्यांना ‘एसआयडी’च्या विशेष संरक्षण शाखेकडून सुरक्षा पुरविली जाते. मिळालेल्या माहितीनुसार, सध्या पूर्ण राज्यभरात यासाठी ८०० हून अधिक पोलीस प्रतिनियुक्तीवर कार्यरत आहेत. त्यापैकी जवळपास २०० जणांचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपला आहे. मात्र, अद्यापही त्यांना त्यांच्या मूळ पोलीस घटकात पाठविण्यात आलेले नाही. विविध घटकांतून प्रतिनियुक्तीवर आलेल्या या ‘बॉडी गार्ड’ची निवड मैदानी चाचणी घेऊन होते. नियुक्ती झालेल्यांना नियमित वेतनाशिवाय त्यांचे मूळ वेतन व ग्रेड पेच्या निम्मी रक्कम अतिरिक्त स्वरूपात मिळते. त्याशिवाय वजनदार नेत्यासोबत वावरत असल्याने फुकटचा सन्मान आणि बऱ्यापैकी वरकमाईही होते. त्यांच्या प्रतिनियुक्तीचा कालावधी पाच वर्षांचा असतो. मात्र, कार्यकाळ संपूनही त्यांना ही ड्युटी सोडावीशी वाटत नाही. उलट नेत्यांमार्फत अधिकाºयांवर दबाव टाकून अनेक जण कार्यकाळ वाढवितात. त्यातच आता लोकसभा व विधानसभा निवडणुका तोंडावर असल्याने या नेत्यांना आणि त्यांच्या ‘बॉडी गार्ड’ना एकमेकांचा सहवास सोडवेनासा झाला आहे. गुप्तवार्ता विभागातील अधिकाºयांनीही त्याकडे दुर्लक्ष केले असल्याची चर्चा आहे.

परीक्षा झाली, नोकरीची प्रतीक्षा कायम
‘एसपीयू’त निवड होण्यासाठी इच्छुक असलेल्या विविध घटकांतील दीड हजारांहून अधिक पोलिसांची आॅक्टोबर ते नोव्हेंबरमध्ये पाच टप्प्यांत पुण्यातील राज्य राखीव दलाच्या मैदानावर स्पर्धा घेण्यात आली. त्यांची ८०० व १०० मीटर धावणे, पुलअप्स, शस्त्र चालविण्याची क्षमतेबद्दल १०० मार्कांची परीक्षा घेण्यात आली. मेरिटप्रमाणे निवड होईल, अशी अपेक्षा असताना कार्यकाळ संपलेल्या पोलिसांना अद्याप सोडण्यात आलेले नाही. त्यामुळे त्यांची प्रतीक्षा वाढत चालली आहे. मैदानी परीक्षेला चार महिने उलटूनही अद्याप त्यांच्या निवडीबद्दल काहीही निर्णय विभागाकडून घेण्यात आलेला नाही.

...त्यानंतर प्रकरण थंडावले
एसीबीचे महासंचालक संजय बर्वे हे यापूर्वी राज्य गुप्तवार्ता विभागात असताना, त्यांनी या ठिकाणी अनेक वर्षांपासून ठिय्या देऊन बसलेल्या पोलीस, कर्मचाºयांना त्यांच्या मूळ घटकात परत पाठविले होते. राजकीय नेते, अधिकाºयांच्या दबावाला न जुमानता त्यांनी या निर्णयाची अंमलबजावणी केली. कार्यकाळ संपलेल्यांना परत पाठवून नवीन भरती करण्यासाठी त्यांच्या सूचनेनुसार नवनियुक्तीसाठी इच्छुकांमध्ये परीक्षा घेण्यात आली होती. मात्र, त्यांची ‘एसीबी’मध्ये बदली झाल्यानंतर हे प्रकरण थंडावले आहे.

प्रतिक्रिया देण्यास नकार : ‘एसपीयू’तील कार्यकाळ संपलेल्या ‘बॉडी गार्ड’ना सोडण्याबाबत गुप्तवार्ता विभागाच्या आयुक्त रश्मी शुक्ला आणि या एसपीयूची जबाबदारी असलेल्या विशेष महानिरीक्षक कृष्ण प्रकाश यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांनी काहीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

Web Title: the 'Body Guard' police forget about the original duty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस