बेपत्ता महिला पोलिसाचा मृतदेह ठाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2016 06:15 AM2016-08-18T06:15:35+5:302016-08-18T06:15:35+5:30

दोन दिवस बेपत्ता असलेल्या महिला पोलीस शिपायाचा मृतदेह मंगळवारी रात्री ठाणे येथे सापडला. माधुरी वासुदेव सोलंकी (२३) असे तिचे नाव आहे. याप्रकरणी तिच्या प्रियकराची- सूरज माळी

The body of the missing woman policeman Thane | बेपत्ता महिला पोलिसाचा मृतदेह ठाण्यात

बेपत्ता महिला पोलिसाचा मृतदेह ठाण्यात

Next

- मनीषा म्हात्रे,  मुंबई

दोन दिवस बेपत्ता असलेल्या महिला पोलीस शिपायाचा मृतदेह मंगळवारी रात्री ठाणे येथे सापडला. माधुरी वासुदेव सोलंकी (२३) असे तिचे नाव आहे. याप्रकरणी तिच्या प्रियकराची- सूरज माळी (२५) याची चौकशी सुरू असल्याची माहिती ‘लोकमत’ला मिळाली. सूरज हा देखील पोलीस शिपाई आहे.
मुळची अमरावतीची रहिवासी असणाऱ्या माधुरीची २०११ मध्ये नागपुरातील पोलीस भरतीत निवड झाली. त्यानंतर मुंबईच्या सशस्त्र पोलीस दल- २ मध्ये तिची पोलीस शिपाई म्हणून नियुक्ती झाली. नोकरी मिळाल्यावर तिने लहान बहिणीसोबत मुंबई गाठली. नवी मुंबईतील रबाळेमधील आनंद कृपा अपार्टमेंटमध्ये तिने भाड्याने खोली घेतली. दोघींनीही रक्षाबंधनासाठी गावी जाण्याची तयारी केली होती. रविवारी सकाळी ७ वाजता नेहमीप्रमाणे तिने घर सोडले मात्र ते कायमचे.
तिच्या बहिणीने सोमवारी वरळी पोलीस ठाण्यात ती बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविली. मंगळवारी रात्री तिचा मृतदेह सापडला. वरळी पोलीस तिथे दाखल झाले. याप्रकरणी वरळी पोलिसांनी तिचा पोलीस प्रियकर सुरज राजेंद्र माळी (२५) याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. सुरज सशस्त्र पोलीस दल २ मध्ये पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहे. दोघांमध्येही प्रेमसंबंध होते.
मुंबई पोलीस दलात कार्यरत असूनही माधुरी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवून घेण्यासाठी
फरफट झाल्याचे रेश्माने सांगितले. (प्रतिनिधी)

मोबाइल सोमवारी सुरू झाला
रविवारी दुपारपासून माधुरीचा मोबाइल बंद झाला. रात्री उशिरापर्यंत ताई घरी परतली नाही. म्हणून रेश्माने रबाळे पोलीस ठाणे गाठले. मात्र त्यांनी तिला वरळी पोलीस ठाण्यात जाण्याचा सल्ला दिला. ताईशी संपर्क होईल या आशेने ती माधुरीच्या मोबाइलवर सतत कॉल करत होती. सोमवारी सकाळी तिच्या दोन मोबाइल क्रमांकापैकी एक सुरू झाला. मात्र प्रतिसाद मिळाला नाही. अखेर दुपारी दोन वाजता तिने वरळी पोलीस गाठले. मंगळवारी रात्री माधुरीचा मृतदेह सापडल्याच्या वृत्ताने सोलंकी कुटुंबियांना धक्का बसला आहे.

माझी ताई आत्महत्या करुच शकत नाही...
‘माझी ताई धाडसी होती. ती नेहमी म्हणायची आयुष्य एकदाच मिळते. त्यामुळे ते संपविण्याचा विचार कधीच करू नये. वेळ आली तर जीव घेईन पण जीव देणार नाही, असे ती नेहमी म्हणे. त्यामुळे माझी ताई आत्महत्या करूच शकत नाही. तिची कोणी तरी हत्या केली असण्याची शक्यता आहे, अशी प्रतिक्रिया रेश्माने ‘लोकमत’ला दिली.

घटनाक्रम
रविवारी सकाळी ७ वाजता - माधुरीने घर सोडले
रविवारी दुपारी दोन वाजता - दोन्ही मोबाईल बंद
सोमवारी सकाळी - दोघांपैकी एक मोबाईल सुरु
सोमवारी दुपारी २ वाजता - वरळी पोलीस ठाण्यात मिसिंग तक्रार
मंगळवारी रात्री - ठाण्यात मृतदेह सापडला

Web Title: The body of the missing woman policeman Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.