प्राध्यापिकेचा मृतदेह आढळला, घरातच ‘बाथरूम क्लीनर’वरून घसरल्याचा संशय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 05:39 AM2018-04-12T05:39:03+5:302018-04-12T05:39:03+5:30
साठ्ये महाविद्यालयाच्या इतिहास या विषयाच्या प्राध्यापिका मनीषा भावे (५३) यांचा बुधवारी राहत्या घरी कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला.
मुंबई : साठ्ये महाविद्यालयाच्या इतिहास या विषयाच्या प्राध्यापिका मनीषा भावे (५३) यांचा बुधवारी राहत्या घरी कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. बाथरूम क्लीनरवरून घसरून त्यांचा मृत्यू झाल्याचा संशय अंधेरी पोलिसांना आहे. या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अंधेरी पूर्वेकडील तेलीगल्लीमधील गौरेश अपार्टमेंटमध्ये भावे या गेल्या वीस वर्षांपासून राहत होत्या. लग्न झाल्यानंतर सहा महिन्यांनी त्यांचा घटस्फोट झाला. गेल्या दोन वर्षांपासून त्या साठ्ये महाविद्यालयात इतिहास या विषयाच्या प्राध्यापिका म्हणून कार्यरत होत्या. बुधवारी त्यांच्या घरातून उग्र वास येत असल्याने शेजाऱ्यांनी याबाबत नियंत्रण कक्षाला माहिती दिली.
अंधेरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्यांच्या भावाला फोन करून याबाबत कळविले. भावाने येऊन फ्लॅटचा दरवाजा उघडला. फ्लॅटमध्ये शिरल्यानंतर बाथरूमच्या दरवाज्यात पडलेला भावे यांचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह पोलिसांना आढळला. तो शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.
बाथरूमच्या जवळ एक बाथरूम क्लीनर लिक्विड सांडलेले होते. भावे यांना रक्तदाबाचा त्रास होता. त्यामुळे त्या घसरून पडल्या असाव्यात, त्यात त्यांच्या डोक्याला दुखापत होत त्यांचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज तपास अधिकाºयांनी व्यक्त केला आहे. जवळपास आठवडाभरापूर्वी त्यांचा मृत्यू झाला असल्याचा संशय
आहे.
कारण त्यांचे शरीर फुगलेल्या अवस्थेत होते. ‘आम्ही या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली असून, अधिक चौकशी सुरू आहे,’ असे अंधेरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित थोरात यांनी सांगितले.
>४ एप्रिलपासून रजेवर
भावे या ४ एप्रिलपासून रजेवर होत्या. त्यांच्या मृत्यूची बातमी कानावर पडल्याने धक्काच बसल्याचे त्यांच्या सहकारी प्राध्यापकांचे म्हणणे आहे. त्यांचा मृत्यू ४ एप्रिललाच झाल्याचा संशय वर्तविण्यात येत आहे.