दोन महिन्यांनी हत्येचा उलगडा, मेहुण्यासह ७ जणांना अटक
दोन महिन्यांनी हत्येचा उलगडा : मेहुण्यासह ७ जणांना अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या भाऊजीच्या अत्याचाराला त्रासलेल्या मेहुण्याने त्याच्या बहीण, भाऊ तसेच मित्रांच्या मदतीने त्याची हत्या करत घरातच मृतदेह पुरल्याची धक्कादायक घटना कुर्ल्यामध्ये घडली आहे. दोन महिन्यांनी या हत्येचा उलगडा झाला. या प्रकरणी विनोबा भावे नगर पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे.
विनोबा भावे नगर परिसरात राहणारा दीपक उर्फ कोत्या जगन्नाथ सांगळे (२८) याची हत्या करण्यात आली आहे. २१ जून रोजी त्याची बहीण संगीता सांगळेच्या तक्रारीवरून तो हरविल्याची नोंद करत पोलिसांनी तपास सुरू केला. तो १५ जूनपासून बेपत्ता असल्याचे बहिणीने पोलिसांना सांगितले. सांगळे हा अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहे. या प्रकरणी गुन्हे शाखेच्या कक्ष ५ नेही समांतर तपास सुरू केला.
बहिणीने दिलेल्या तक्रारीत घरच्यांवर संशय व्यक्त केला होता. हाच धागा पकडून पोलिसांनी तपास सुरू केला. त्यानुसार मेहुणा आदित मस्ताराम गौतम (१९) याला ताब्यात घेत चौकशी केली. त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. सांगळे हा मेव्हण्याच्या बायकोसह त्याच्या घरच्यांना त्रास देत असल्यामुळे सगळे जण त्याला वैतागले होते.
गौतमने मोठा भाऊ आनंद, बहिणी सरस्वती दीपक सांगळे (२१), मनीषा प्रशांत आचारी (२५) तसेच विशाल राजू कराडे (२५), किशोर प्रमोद साहू (२४), हृतिक प्रेमसिंग विश्वकर्मा (२२) यांच्या मदतीने त्याच्या हत्येचा कट आखला. १५ जून रोजी घरात हत्या करून तेथेच त्याचा मृतदेह पुरला. चाळीत कोपऱ्यात घर असल्यामुळे कुणाला त्यांच्यावर संशय आला नाही.
धक्कादायक बाब म्हणजे १० बाय १० च्या खोलीत मृतदेह पुरलेल्या घरातच ही मंडळी राहत होती. पोलिसांनी सातही जणांना अटक केली आहे. तर शनिवारी मृतदेह बाहेर काढून पुढील तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे. पोलीस उपायुक्त प्रणय अशोक, साहाय्यक पोलीस आयुक्त सुरेश जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पंकज धाडगे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
.....