* मानखुर्दमधील धक्कादायक घटना
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : एका तरुणीवर बलात्कार केल्यानंतर तिची निर्घृण हत्या करून मृतदेह प्लास्टिकच्या गोणीत घालून नाल्यात फेकून दिल्याची धक्कादायक घटना मानखुर्द येथे घडली. झाकीर हुसेन नगरजवळील नाल्यात रविवारी रात्री तिचा मृतदेह मिळून आला. अज्ञात हल्लेखोरांनी हे कृत्य केले आहे. ते फरार झाले आहेत. मृत तरुणीची ओळख अद्याप पटलेली नाही.
या धक्कादायक घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मृत तरुणीची ओळख पटविणे व हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी स्वतंत्र पथक नेमण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. अज्ञात आरोपीविरुद्ध खून, बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मानखुर्दमधील झाकीर हुसेननगरच्या बाजूला छोटासा नाला आहे. रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास त्यात पडलेल्या प्लाटिकच्या गोणीला भटके कुत्रे फाडून खात असल्याचे एका नागरिकाला आढळले. त्याने तातडीने पोलीस नियंत्रण कक्षाला कळविल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गोणी उघडून पाहिले असता त्यात २५ ते ३० वर्षांच्या तरुणीचा मृतदेह आढळून आला. तिची हत्या करून गळा व पाय ओढणीने बांधलेले होते. शवविच्छेदन केल्यानंतर हत्येपूर्वी आरोपींनी तिच्यावर बलात्कार केला असल्याचे स्पष्ट झाले आहे. तरुणीची ओळख पटलेली नाही. त्यासाठी परिसरात माहिती घेण्यात येत आहे. माहिती असणाऱ्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन मानखुर्द पोलिसांनी केले आहे.