Join us

मुंबईतील तरुणाचा मृतदेह ठाण्याच्या खाडीत सापडला

By admin | Published: June 19, 2017 2:29 AM

मुंबई, विक्रोळीतील सूर्यनगर भागात राहणाऱ्या गणेश इंगोले (१८) या तरुणाचा मृतदेह ठाण्यातील कशेळी खाडीत रविवारी दुपारी सापडला.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : मुंबई, विक्रोळीतील सूर्यनगर भागात राहणाऱ्या गणेश इंगोले (१८) या तरुणाचा मृतदेह ठाण्यातील कशेळी खाडीत रविवारी दुपारी सापडला. लोकलमध्ये स्टंट करताना, तो कळवा खाडीत पडल्याची शक्यता वर्तविण्यात येत असून, या प्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.गणेश हा रविवारी ११ जूनला घरी न परतल्याने, त्याच्या कुटुंबीयांनी पार्कसाइट पोलीस ठाण्यात तो बेपत्ता झाल्याची तक्र ार दाखल केली होती. त्यानुसार, पोलिसांनी तपास सुरू असताना, मध्य रेल्वे स्टेशनच्या सीसीटीव्हीत १० जून रोजी तो विक्रोळी स्टेशनवरील सीसीटीव्हीमध्ये त्याच्या काही मित्रांसोबत जाताना दिसून आला. तो कळवा स्टेशनच्या सीसीटीव्हीमध्ये त्याच्या मित्रांसोबत लोकलमधून उतरताना दिसला नाही. त्यामुळे पोलिसांनी त्याच्या मित्रांची चौकशी केली असता, पाचव्या दिवशी गणेश कळवा खाडीत पडल्याची माहिती पुढे आली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी ठाणे महापालिका जवाहर बाग अग्निशमन केंद्रातील जवानांच्या मदतीने कळवा खाडी परिसरात त्याचा शोध घेतला. मात्र, तो सापडला नाही. रविवारी दुपारी कशेळी खाडीत एक मृतदेह वाहून आल्याचे, ठाणे आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाला स्थानिकांनी सांगितले. तो मृतदेह गणेश इंगोले याचाच असल्याची माहिती ठाणे आपत्ती व्यवस्थापन कक्षप्रमुख संतोष कदम यांनी दिली. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.