बॉडीलाइन, फादर अॅग्नेल संघ विजयी
By admin | Published: April 19, 2016 02:42 AM2016-04-19T02:42:30+5:302016-04-19T02:42:30+5:30
आक्रमक व्यूहरचना आणि शिस्तबद्ध खेळाच्या जोरावर चुरशीच्या सामन्यात बॉडीलाइन संघाने बांद्रा युनायटेड संघावर २-१ ने मात करून मुंबई जिल्हा फुटबॉल संघटना
मुंबई : आक्रमक व्यूहरचना आणि शिस्तबद्ध खेळाच्या जोरावर चुरशीच्या सामन्यात बॉडीलाइन संघाने बांद्रा युनायटेड संघावर २-१ ने मात करून मुंबई जिल्हा फुटबॉल संघटना (एमडीएफए) आयोजित महिला फुटबॉल लीग स्पर्धेत कूच केली. अन्य सामन्यात फादर अॅग्नेल रेड संघाने फुटबॉल लीडर्स अॅकॅडमी संघाचा २-० असा धुव्वा उडवला.
क्रॉस मैदानातील कर्नाटक स्पोर्टिंग असोसिएशनच्या मैदानात सुरू असलेल्या महिला लीग स्पर्धेत बॉडीलाइनने आक्रमक खेळ करताना अपेक्षित विजय मिळवला. बॉडीलाइनच्या लेवनाह दिवेकरने वेगवान गोल करत संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. प्रत्युत्तरात युनायटेडच्या खुशबू राठोडने गोल करत १-१ अशी बरोबरी साधली. या वेळी सामना बरोबरीत सुटणार अशी चिन्हे दिसत होती. मात्र किंबर्ले फर्नांडिसने निर्णायक गोल करताना बॉडीलाइन संघाला २-१ असे विजयी केले.
त्याचवेळी फादर अॅग्नेल रेड संघाने फुटबॉल लीडर्स अॅकॅडमी संघाचा २-० असा सहज पराभव केला. विजयी संघाच्या नेव्हीला कोलाको आणि व्हेल्नसिया फर्नांडिसने प्रत्येकी एक गोल केला. लीडर्स संघाच्या आक्रमकांनी गोल करण्याचा चांगला प्रयत्न केला, पण रेड संघाची बचावफळी भेदण्यात त्यांना अपयश आले. दुसरीकडे केंकरे फुटबॉल क्लब आणि आधार प्रतिष्ठान यांच्यातील सामना गोलशून्य बरोबरीत सुटला. (क्रीडा प्रतिनिधी)