‘बोईंग ७३७ मॅक्स’ विमानांच्या उड्डाणाचा मार्ग झाला मोकळा 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2021 09:27 AM2021-08-28T09:27:40+5:302021-08-28T09:28:08+5:30

‘डीजीसीए’चा हिरवा कंदील; २०१९ पासून भारतीय हद्दीत होती बंदी

The Boeing 737 Max has got permission to fly after accidents row pdc | ‘बोईंग ७३७ मॅक्स’ विमानांच्या उड्डाणाचा मार्ग झाला मोकळा 

‘बोईंग ७३७ मॅक्स’ विमानांच्या उड्डाणाचा मार्ग झाला मोकळा 

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अमेरिकन बनावटीच्या ‘बोईंग ७३७ मॅक्स’ विमानांच्या उड्डाणाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. सहा महिन्यांच्या आत झालेल्या दोन अपघातांनंतर २०१९ मध्ये या विमानांच्या उड्डाणावर बंदी घालण्यात आली होती. आता भारतीय हवाई हद्दीत त्यांचे प्रचलन करण्यास नागरी उड्डाण महासंचालनालयाने (डीजीसीए) परवानगी दिली आहे.

२९ ऑक्टोबर २०१८ रोजी इंडोनेशिया आणि ९ मार्च २०१९ रोजी इथोपिया येथे ‘बोईंग ७३७ मॅक्स’ या विमानांना अपघात झाला होता. या दोन्ही घटनांत मिळून जवळपास ३४६ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. विमानांच्या रचनेतील दोषांमुळे अपघात झाल्याचे तपासात समोर आले होते. त्यात असलेल्या ‘एमसीएएस’ प्रणालीमुळे विमानाच्या नाकाकडील भाग खाली ढकलला जातो. आपत्कालीन स्थितीत विमानाने हेलकावे खाल्ल्यास गती परावर्तित होऊन ते दगडासारखे खाली कोसळते, असेही निरीक्षण नोंदविण्यात आले होते. तपास अहवाल समोर आल्यानंतर जगभरात ‘बोईंग ७३७ मॅक्स’ विमानांवर बंदी घालण्यात आली.

या विमानांची उत्पादक बोईंग कंपनीने त्रुटी दूर करीत सुरक्षात्मक उपायांची पूर्तता केल्यानंतर ती पुन्हा वापरात आणण्याची परवानगी मागितली. नोव्हेंबर २०२० मध्ये यूएस फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशनने त्यांच्यावरील बंदी उठविली. त्यानंतर जपान, युरोप, ब्रिटन, कॅनडा, ब्राझील व संयुक्त अरब अमिरातीनेही या विमानांच्या वापरास परवानगी दिली. मात्र, ‘डीजीसीए’ने मंजुरी न दिल्याने भारतीय हवाई हद्दीतून ‘बोईंग ७३७ मॅक्स’ विमानांचे प्रचलन करता येत नव्हते. आता तो अडथळा दूर झाला .

भारतात किती विमाने? 
भारतात स्पाईस जेट आणि जेट एअरवेजकडे ‘बोईंग ७३७ मॅक्स’ प्रकारातील १८ विमाने आहेत. २०१९ पासून ती जमिनीवर उभी आहेत. नव्याने येऊ घातलेली अकासा एअरसुद्धा आपल्या ताफ्यात अशी विमाने दाखल करण्याच्या विचारात आहे.
जगभरातील १७ नियामकांनी ‘बोईंग ७३७ मॅक्स’ विमानांना परवानगी दिली आहे. त्याशिवाय ३४ विमान कंपन्यांची ३४५ विमाने ९ डिसेंबर २०२० पासून नियमित सेवा देत आहेत. २.८९ लाख संचयी तास उड्डाण केल्यानंतर ती सुरक्षित असल्याचे दिसून आल्यामुळे परवानगी देत असल्याचे डीजीसीएने म्हटले आहे.
आता केवळ चीनमध्ये या विमानांवरील बंदी कायम आहे.

Web Title: The Boeing 737 Max has got permission to fly after accidents row pdc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :airplaneविमान