नेहरू सायन्स सेंटरमध्ये दिसणार ‘बोइंग ७४७-२०० सिम्युलेटर’
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2019 05:01 AM2019-02-05T05:01:05+5:302019-02-05T05:01:27+5:30
एअर इंडिया कंपनीकडे गेल्या २१ वर्षांपासून वैमानिकांसाठी सिम्युलेटर विमान वापरले जात होते. आता नवीन प्रकारचे सिम्युलेटर आणण्यात आले आहे.
मुंबई : एअर इंडिया कंपनीकडे गेल्या २१ वर्षांपासून वैमानिकांसाठी सिम्युलेटर विमान वापरले जात होते. आता नवीन प्रकारचे सिम्युलेटर आणण्यात आले आहे. त्यामुळे एअर इंडिया कंपनीने जुने ‘बोइंग ७४७-२०० हे सिम्युलेटर’ वरळी येथील नेहरू सायन्स सेंटर येथे सर्वसामान्य लोकांना बघण्यासाठी ठेवले आहे.
एअरपोर्ट अॅथोरिटी आॅफ इंडिया पश्चिम विभागाचे कार्यकारी संचालक केशव शर्मा यांनी सोमवारच्या कार्यक्रमात नेहरू सायन्स सेंटरला ‘बोइंग ७४७-२०० सिम्युलेटर’ हस्तांतरित करण्याची घोषणा केली.
गेल्या कित्येक वर्षांपासून वैमानिकांना प्रशिक्षित करण्यासाठी एअर इंडिया याचा वापर करीत होती. कॅनेडियन एव्हियेशन इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीने हे बोइंग ७४७-२०० सिम्युलेटर १९८० साली बनविले होते. जेव्हा ते एअर इंडिया कंपनीच्या ताफ्यात आले होते तेव्हा त्या काळातले हे बोइंग ७४७-२०० सिम्युलेटर अत्याधुनिक प्रकाराचे होते. त्यातून वैमानिकांना विमानातील छोट्या-छोट्या तंत्रज्ञानाचे शिक्षण दिले जात होते. दरम्यान, एअरपोर्ट अॅथोरिटी आॅफ इंडिया आणि नेहरू सायन्स सेंटरमध्ये दोन कोटी रुपयांचा सामंजस्य करार करण्यात आला. या कराराद्वारे नेहरू सायन्स सेंटरमध्ये एव्हियेशन गॅलरी उभारण्यात येणार आहे. एव्हियेशन क्षेत्राची माहिती
या एव्हियेशन गॅलरीमधून दिली जाणार आहे.