जवानाच्या वडिलांनी बनविले बोगस रेशनिंग कार्ड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 02:49 AM2017-08-02T02:49:23+5:302017-08-02T02:54:55+5:30
विविध प्रकल्प तसेच शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी बोगस शिधापत्रिका सर्रास बनविल्या जात आहेत. अशातच उत्पन्नासंबंधीची खोटी माहिती सादर करत एका जवानाच्या वडिलांनीही...
मुंबई : विविध प्रकल्प तसेच शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी बोगस शिधापत्रिका सर्रास बनविल्या जात आहेत. अशातच उत्पन्नासंबंधीची खोटी माहिती सादर करत एका जवानाच्या वडिलांनीही अशी शिधापत्रिका बनविल्याचे समोर आले. चार वर्षांनंतर प्रशासनाला जाग येताच त्यांनी ती शिधापत्रिका रद्द केली.
कांजूरच्या कर्वे नगर परिसरात संदीप रेणुसे राहतात. त्यांचा मुलगा सैन्यात आहे. त्यांनी उत्पन्नाबाबत खोटी माहिती सादर करत दारिद्र्यरेषेखालील शिधापत्रिका बनविल्याची तक्रार तेथील रहिवासी शैलेश शर्मा यांनी दिली. त्यानुसार शिधावाटप अधिकाºयांनी गेल्या वर्षी चौकशीला सुरुवात केली. तेव्हा रेणुसे यांनी शिधापत्रिकेसाठी सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळल्या. त्यानुसार त्यांच्याकडील शिधापत्रिका रद्द करण्यात आली. मात्र अशा प्रकारे मुंबईत रेशनिंग अधिकाºयांना हाताशी धरूनच काही दलाल खोट्या कागदपत्रांच्या आधारे शिधापत्रिका बनवून देत आहेत.
शासनाच्या योजनांसह विविध गृहप्रकल्पांमध्ये याच रेशनिंग कार्डच्या आधारे घरे लाटण्याचा प्रकारही केला जातो. आजही रेशनिंग कार्यालयाबाहेर मोठ्या प्रमाणात दलालांचा सुळसुळाट आहे. त्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे. शासनाची फसवणूक केल्याबाबत त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करणे गरजेचे आहे. रेणुसे यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात यावा. म्हणून प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. मात्र संबंधित अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे तक्रारदार शैलेश शर्मा यांनी सांगितले. याबाबत संदीप रेणुसे यांच्याशी संपर्क साधला मात्र तो होऊ शकला नाही. तसेच मेसेजलाही त्यांनी काही प्रतिसाद दिला नाही