ठाणे : शालेय शिक्षण विभागाने सर्व शाळा, त्यातील शिक्षक व विद्यार्थ्यांची इत्थंभूत माहिती सरल प्राणालीव्दारे आॅनलाइन लोड करण्याचे आदेश जारी केले आहेत. त्यानुसार, शिक्षकांची माहिती आॅनलाइन लोड झाली आहे. त्यामध्ये संबंधित शिक्षकांच्या वैयक्तिक माहितीसह शैक्षणिक पात्रता, त्यांची संपूर्ण कागदपत्रे, पदव्यांचे प्रमाणपत्र, नोकरी आदेश आदींची संपूर्ण माहिती संकलित केली आहे. त्या कागदपत्रांची ठिकठिकाणी तपासणी केल्यास बोगस पदवी घेतलेले शिक्षक उघडकीस येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. डीएड, बीएड, एमएड, बीपीएड आदी पदव्या घेऊन शिक्षक झालेल्या सर्वच शिक्षकांची शैक्षणिक प्रमाणपत्रे या सरल प्रणालीत स्कॅन करून संकलित केली आहेत. शासकीय यंत्रणेव्दारे त्यांची कोणत्याही क्षणी गोपनीय चौकशी ठिकठिकाणच्या विद्यापीठांसह महाविद्यालये, शाळांकडे होण्याची शक्यता आहे. त्या चौकशीमध्ये बोगस शिक्षकांचे पितळ उघडे पडण्याची शक्यता नाकारण्यासारखी नसल्याचे शिक्षकवर्गात बोलले जात आहे. जिल्ह्यात सध्या चार हजार ४५३ शाळा असून त्यामध्ये १५ लाख १६ हजार २९५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यांना ३९ हजार ८८४ शिक्षक शिकवत आहेत. या शिक्षकांची संपूर्ण माहिती आता आॅनलाइन संकलित केली आहे. त्याव्दारे विविध टप्प्यांवर या शिक्षकांची गोपनीय चौकशीची शक्यता असल्याचे शिक्षकांकडून सांगितले जात आहे. ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने सेवा ज्येष्ठतेनुसार शिक्षकांना मुख्याध्यापक, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख आदींसह काहींना पदवीधर म्हणून शैक्षणिक पात्रतेत वाढ केली, त्या वेळीदेखील या बोगस शिक्षकांच्या पदोन्नतीला काही शिक्षकांनी विरोध केला होता. पण, आता शासनाकडूनच या पदव्यांची चौकशी होणार असल्यामुळे संबंधितांचे धाबे दणाणले आहेत.
सरल प्रणालीमुळे बोगस शिक्षक सापडणार!
By admin | Published: October 03, 2015 2:09 AM