समतानगरमध्ये बोगस मतदान
By admin | Published: February 22, 2017 07:26 AM2017-02-22T07:26:17+5:302017-02-22T07:26:17+5:30
बोगस मतदान रोखण्यासाठी निवडणूक आयोगाने अनेक उपाययोजना केल्या असल्या तरी कांदिवली समतानगरातील वॉर्ड
मुंबई : बोगस मतदान रोखण्यासाठी निवडणूक आयोगाने अनेक उपाययोजना केल्या असल्या तरी कांदिवली समतानगरातील वॉर्ड क्रमांक २५ मधील एका मतदान केंद्रावर एका महिलेने बोगस मतदान केल्याचे उघड झाले. बोगस मतदार निघून गेल्यानंतर थोड्या वेळाने खरीखुरी मतदार या ठिकाणी आल्याने हा प्रकार चव्हाट्यावर आला. तिने मतदानासाठी आग्रह धरल्याने निवडणूक अधिकाऱ्यांना तिला प्रगत मतदान अर्जाद्वारे पुन्हा मतदान करण्याचा हक्क देणे भाग पडले. या प्रक्रियेसाठी सुमारे ४० मिनिटे त्यांना मतदान केंद्रावर थांबून राहावे लागले.
बोगस मतदानाच्या दुर्लक्षाबाबत क्षेत्रीय अधिकारी तांबे यांच्याकडे ‘लोकमत’च्या प्रतिनिधीने विचारणा केली असता ते उडवाउडवीचे उत्तर देत तेथून पसार झाले. त्यामुळे गाफीलपणा दाखविणाऱ्या निवडणूक अधिकारी, कर्मचाऱ्यांवर काय कारवाई केली जाणार, हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.
पश्चिम उपनगरातील आर/एस वॉर्डमधील प्रभाग क्रमांक २५ हा सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित आहे. त्याचे समतानगर (पू) येथील समता विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयातील बूथ क्रमांक २४ मध्ये अरुणा अशोक चव्हाण यांचे मतदान होते. सध्या त्या भार्इंदर येथे राहत असल्याने मतदान केंद्रावर अडीच वाजण्याच्या सुमारास पोहोचल्या. मात्र केंद्रात पोहोचल्यानंतर त्यांच्या नावावर मतदान करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. बूथमधील ३८१ क्रमांकाचे मतदान त्यांच्या नावावर करण्यात आले होते. त्यामुळे संतप्त झालेल्या अरुणा चव्हाण यांनी आपले ओळखपत्र दाखवीत त्याबाबत निवडणूक क्षेत्रीय अधिकारी तांबे यांच्याकडे विचारणा केली असता ते उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले. त्यामुळे त्यांनी हा प्रकार काही उमेदवारांच्या निदर्शनास आणल्यानंतर त्यांनीही अधिकाऱ्यांना जाब विचारला. त्यामुळे त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारून चव्हाण यांना प्रगत मतदान पद्धतीद्वारे मतदान करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार विहित नमुन्यातील अर्ज भरून त्या ठिकाणी पसंतीच्या उमेदवाराचे निवडणूक चिन्ह लिहून त्यावर शिक्का मारण्यात आला. अर्ज लिफाफ्यात घालून सील करण्यात आला. त्यांच्या नावे मतदान केलेल्या तोतया महिला मतदाराने दाखविलेल्या ओळखपत्रावरील फोटो अस्पष्ट असल्याने बोगस मतदान घडल्याची कबुली मतदान कार्याध्यक्ष नेंगी यांनी दिली. (प्रतिनिधी)