मुंबई : मंत्रालयात शिपायाकडूनच लिपिक पदाच्या भरतीच्या नावाने प्रत्येकी ६ ते १० लाख रुपये उकळून फसवणुकीचे रॅकेट सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी मंत्रालयातील शिपायासह तिघांना गुन्हे शाखेने अटक केली आहे. याप्रकरणी त्यांच्याकडे अधिक तपास सुरू आहे.
मंत्रालयात शिपाई असलेल्या सचिन डोळस याच्यासह महेंद्र नारायण सकपाळ, महादेव शेदू शिरवाळे व नितीन कुंडलिक साठे या चौकडीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आतापर्यंत या रॅकेटचे बळी ठरलेले १० जण समोर आले असून, त्यांची ७३ लाखांहून अधिक रुपयांची फसवणूक झाली आहे. या तरुणांच्या मंत्रालयातच मुलाखती पार पडल्यामुळे त्यांचा विश्वास बसला होता. याप्रकरणी जाळ्यात अडकलेल्या तिघांकडे कसून चौकशी सुरू आहे.
रॅकेटमध्ये कोणाचा सहभाग?या रॅकेटमध्ये किती जण सहभागी आहेत, मंत्रालयातील आणखी किती कर्मचाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे, तसेच मुलाखतीदरम्यान कुणाच्या ओळखपत्राचा वापर करण्यात आला, कुणाच्या वरदहस्तामुळे हे रॅकेट सुरू होते, अशा विविध प्रश्नांचा गुन्हे शाखेकडून तपास सुरू आहे.