मुंबई : आयुर्वेदिक उपचाराच्या नावाखाली मुंबईकरांना लाखोंचा गंडा घालणाऱ्या बोगस डॉक्टरांचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी ठाण्यातून ८ बोगस डॉक्टरांना अटक केली आहे. आझाद मैदान परिसरात राहणारे ६० वर्षीय गोविंद अपराज यांच्या मुलीला फिट येण्याचा त्रास होता. पत्नीसोबत टॅक्सीतून रुग्णालयाच्या चकरा मारत असताना त्यांना ठाणे येथील या टोळीच्या गजानन आयुर्वेदिक क्लिनिकची माहिती मिळाली. त्यानुसार अपराज त्यांच्या पत्नीसह क्लिनिकमध्ये गेले. तेव्हा या टोळीने त्यांना बाजारातून मध आणण्यास सांगितले. मधामध्ये सुवर्णभस्म टाकल्याचे सांगून या दाम्पत्याच्या हातात त्यांनी ९ लाखांचे बिल त्यांच्या माथी मारले. अपराज कुटुंबीयांनी पैसे देण्यास नकार देताच या टोळीने त्यांना दमदाटी करण्यास सुरुवात केली. सुवर्णभस्म टाकून तयार केलेले औषध वाया घालवता येत नाही. तसेच तब्बल ६० हजार रुपये या टोळीने उकळले. त्यानंतर अपराज दाम्पत्यांनी थेट आझाद मैदान पोलीस ठाणे गाठून झालेला घटनाक्रम सांगितला. त्यांच्या तक्रारीवरुन संबंधितांवर गुन्हा दाखल केला. (प्रतिनिधी)
बोगस डॉक्टरांचा मुंबईकरांना गंडा
By admin | Published: February 16, 2016 3:05 AM