बोगस महिला वकिलाची तब्बल चौदा वर्षे प्रॅक्टीस, पोलिसांनी केली अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2022 10:25 AM2022-09-20T10:25:27+5:302022-09-20T10:26:08+5:30
मुंबईत बीकेसी पोलिसांनी केली अटक
लाेकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गेल्या १४ वर्षे मुंबईत कायद्याचा सराव करणाऱ्या ७२ वर्षीय बोगस वकिलाला बीकेसी पोलिसांनी अटक केली. बीकेसी पोलिसांच्या म्हणण्यानुसार, ही महिला वांद्रे पश्चिमेतील पाली हिल येथील रहिवासी असून, मोरदेकाई रेबेका जौब ऊर्फ मंदाकिनी काशीनाथ सोहिनी असे या महिलेचे नाव आहे. तिने अनेक न्यायालयात प्रॅक्टिस केल्याची बाब उघडकीस आली आहे.
पोलिसांनी १५ जुलै रोजी तिची ओळखपत्रे पडताळून पाहण्यासाठी तिला पोलीस ठाण्यात बोलावले होते; परंतु ती त्यांच्यासमोर हजर झाली नाही. शनिवारी जेव्हा सोहिनीने पोलीस ठाण्यात जाऊन तिची पदवी आणि तिचे आधार कार्ड तसेच वकालतनामा सादर केला तेव्हा अधिकाऱ्यांनी तिची विश्वासार्हता पडताळून पाहिली. त्यात तिची कागदपत्रे आणि कायद्याचा सराव करण्याचा परवाना बनावट निघाला. या फसवणुकीची माहिती देण्यासाठी पोलिसांनी आता महाराष्ट्र आणि गोव्याच्या बार कौन्सिलशी संपर्क साधला आहे, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. सोहिनीविरोधात बोरीवलीत राहणारे वकील अकबरअली मोहम्मद खान (४४) यांनी तक्रार दाखल केली होती. सोहिनी ही वकील नसूनही कौटुंबिक आणि इतर न्यायालयांत अनेक दशकांपासून प्रॅक्टिस करत असल्याचा दावा त्यांनी केला.
वर्षभरापासून पाठपुरावा
nएक वर्षापूर्वी मला तिची बनावट ओळख कळली. तेव्हापासून मी तिचा पाठपुरावा करत होतो, असे खान यांनी पोलिसांना सांगितले.
nअसे खोटे लोक वकिली व्यवसायाची बदनामी करत आहेत. ही जबाबदारी बार कौन्सिलची आहे. त्यांनी वेळोवेळी बार कौन्सिलकडे नोंदणी केलेल्या वकिलांची पडताळणी केली पाहिजे, असेही खान म्हणाले.
nन्यायालयाने तिला २० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे, असे बीकेसीमधील एका अधिकाऱ्याने सांगितले.