मुंबई : सार्वजनिक परिसर स्वच्छ राहावा व नागरिकांना शिस्तीचे धडे शिकविण्यासाठी महापालिकेने ‘क्लीन-अप मार्शल’ची फौज नियुक्त केली. या मार्शलना मास्क न लावणाऱ्या लोकांवर कारवाई करण्याचे अधिकारही देण्यात आले आहेत. कारवाईच्या नावाखाली काही मार्शल तोडपाणी अथवा लोकांना दमदाटी करीत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. घाटकोपर येथील अशाच एका घटनेची तक्रार पुढे आली आहे. संबंधित मार्शल बोगस असल्याचा दावा पालिका अधिकारी करीत आहेत.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी तोंडाला मास्क लावणे अनिवार्य आहे. मास्क न लावणाऱ्या नागरिकांकडून दोनशे रुपये दंड वसूल केला जातो. काहीवेळा क्लीन-अप मार्शलकडून अरेरावी व दमदाटी केली जात असल्याच्या तक्रारी येत असतात.
अलीकडे क्लीन अप मर्शलच्या नावाखाली वसुली करणाऱ्या बोगस टोळीचा सुळसुळाट वाढला आहे. घाटकोपर येथे गुरुवारी टिळक रोड येथे बोगस क्लीन अप मार्शलच्या माध्यमातून वसुली सुरू होती. स्थानिक नागरिकांनी विरोध केल्यानंतर हे मार्शल पळून गेले. त्यांचे व त्यांच्या मोटारसायकलचे छायाचित्र घेऊन याबाबत पालिकेला तक्रारही करण्यात आली आहे.
बोगस पावती पुस्तक, ओळखपत्र व जॅकेट घालून ही लूट सुरू आहे. याबाबत स्थानिक माजी नगरसेवक प्रवीण छेडा यांनी पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडे तक्रार केली होती. मात्र या बोगस टोळीबाबत पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचा सल्ला अधिकाऱ्यांनी त्यांना दिला. याकडे त्यांनी पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांचे लक्ष वेधले आहे. त्यांच्या भूमिकेकडे लक्ष आहे.