लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : नोंदणीकृत महिला डॉक्टर दोन वर्षांपासून सोलापूरला पीजीचे शिक्षण घेत असताना त्यांच्या नावावर अन्य महिला पालिकेच्या अतिदक्षता विभागात उपचार देत असल्याची धक्कादायक माहिती मुलुंड पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यातून समोर येत आहे. विशेष म्हणजे संबंधित महिलेच्या कार्यकाळात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. अशाचप्रकारे जीवन ज्योत चॅरिटेबल ट्रस्ट या खासगी संस्थेने मुलुंडच्या एम. टी. अगरवाल रूग्णालयात नियुक्त केलेल्या डॉक्टरांपैकी काही डॉक्टर बोगस असून, ते डॉक्टर जिवांशी खेळत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याच आरोपावरून संस्थेसह त्यांच्या विश्वस्तांविरुद्ध गुन्हा नोंदवत पोलिस अधिक तपास करत आहेत.
मुलुंडला राहणारे गोल्डी देवकीनंदन शर्मा (४३) यांच्या तक्रारीवरून मुलुंड पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. गोल्डी यांच्या भावाचा ४ जून २०१९ रोजी अगरवाल रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर त्यांना संशय आल्याने त्यांनी पाठपुरावा सुरू केला. आयसीयूमध्ये काम करणाऱ्या डॉक्टरबाबत माहिती घेताच, जीवन ज्योतमार्फत त्यांना नियुक्त करण्यात येत असल्याचे समजले. त्यातूनच, काही डॉक्टर बोगस असल्याचा आरोप गोल्डी यांनी केला आहे.
दरम्यान, मिळालेल्या माहितीत, संस्थेने नियुक्त केलेल्या डॉ. पूजा यादव या सोलापूर येथे दोन वर्षांपासून पीजीचे शिक्षण घेत असून, यादव यांना जीवनज्योतने नियुक्त केले होते. त्यांच्या ऐवजी अन्य महिलेने आयसीयूतील रुग्णांना उपचार दिले.
दोन वर्षांत पावणेनऊ कोटीपालिकेने १७ मे २०१८ ते १६ मे २०२० पर्यंत जीवनज्योत ट्रस्टला ८ कोटी ८३ लाख ३० हजार रुपये दिले आहेत.
डॉक्टरविरोधात गुन्हे अन् बरेच काही...जीवनज्योतने नियुक्त केलेल्या डॉ. परवेझ शेखला अटकही करण्यात आली. दरम्यान, १७ फेब्रुवारी २०१८ ते २२ नोव्हेंबर २०१८ पर्यंत १४९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या रुग्णांच्या मृत्यू प्रमाणपत्रावर एकूण १७ डॉक्टरांच्या सह्या होत्या. अन्य माहितीबाबत पाठपुरावा सुरू असल्याचेही गोल्डी म्हणाले.
आरोपात तथ्य नाही...तक्रारदाराने खोटे प्रतिज्ञापत्र सादर करून न्यायालयाची दिशाभूल केली आहे. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संस्थेद्वारे नियुक्त करण्यात आलेल्या डॉक्टरांचा सर्व तपशील पोलिसांना देण्यात येत आहे. जेणेकरून याबाबत सखोल तपास होत योग्य ती कारवाई करण्यात येईल. आमच्या विरोधात करण्यात आलेले सर्व आरोप खोटे असून, दाखल गुन्ह्याविरुद्ध आम्ही न्यायालयात आव्हान देत आहोत. - ॲड. संदीप सिंग, जीवन ज्योत ट्रस्ट
अद्याप अटक नाही...या प्रकरणात गुन्हा नोंदवत अधिक तपास सुरू असून, अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.- कांतीलाल कोथिंबिरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, मुलुंड पोलिस ठाणे