बोगस क्रीडा प्रमाणपत्रे दिली, ९२ जणांच्या नोकरीवर गदा !

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2022 03:48 PM2022-07-30T15:48:51+5:302022-07-30T15:49:35+5:30

कशा पद्धतीने ही बोगस प्रमाणपत्रे मिळविण्यात आली, याचे धक्कादायक किस्से चौकशीमध्ये समोर आले.

Bogus sports certificates were given, 92 people lost their jobs! | बोगस क्रीडा प्रमाणपत्रे दिली, ९२ जणांच्या नोकरीवर गदा !

बोगस क्रीडा प्रमाणपत्रे दिली, ९२ जणांच्या नोकरीवर गदा !

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बोगस क्रीडा प्रमाणपत्रे सादर करून सरकारी नोकऱ्या मिळविणाऱ्या ९२ अधिकारी, कर्मचाऱ्यांवर लवकरच बडतर्फीची कारवाई होण्याची शक्यता आहे. अन्य १७ अधिकारी, कर्मचाऱ्यांना आधीच बडतर्फ करण्यात आले आहे. या ९२ जणांमध्ये सर्वात जास्त कर्मचारी हे गृह विभागाचे आहेत. याशिवाय महसूल, नगरविकास, ऊर्जा, शालेय शिक्षण, लेखा व कोषागरे, कृषी, सामान्य प्रशासन विभागातही बोगस क्रीडा प्रमाणपत्रांच्या आधारे क्रीडा कोट्यातून नोकऱ्या मिळविल्याचे उघडकीस आले आहे. या ९२ जणांची यादी राज्याच्या क्रीडा विभागाच्या वेबसाईटवर टाकण्यात आली आहे.

कशा पद्धतीने ही बोगस प्रमाणपत्रे मिळविण्यात आली, याचे धक्कादायक किस्से चौकशीमध्ये समोर आले. काहीजणांनी बोगस प्रमाणपत्रे स्वत:च लेटरहेड तयार करून आणि संबंधित क्रीडा अधिकाऱ्यांचे नकली सही शिक्के वापरून तयार करवून घेतले. सॉफ्टबॉल, सेपक टकरा, तलवारबाजी, भारोत्तोलन, कयाकिंग कॅनोइंग, ट्रम्पोलिन या क्रीडा प्रकारांमध्ये राज्यस्तरीय, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग नोंदविला वा पदके मिळविली, असे दाखविणारी प्रमाणपत्रे तयार करण्यात आली. या अधिकारी, कर्मचाऱ्यांना त्यांच्या विभागाकडून नोटीस पाठवून बाजू मांडण्यास सांगितले जाण्याचीही शक्यता आहे. क्रीडा विभागाने कर्मचारी, अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष चाचणीसाठी बोलविले तेव्हा ज्या क्रीडा प्रकाराचे प्रमाणपत्र त्यांनी सादर केले आहे तोे खेळ कसा खेळतात, हेदेखील काहींना माहिती नव्हते. बहुतेकांना खेळाचे नियम काय तेदेखील सांगता आले नाही. भारोत्तोलनात पदके जिंकणारे काहीजण ४० किलोही वजन चाचणीच्या वेळी उचलू शकले नाहीत. 

प्रमाणपत्रांबाबत तक्रारी आल्यानंतर आमच्या विभागाने सखोल चौकशी केली असता यादीतील कर्मचाऱ्यांची प्रमाणपत्रे बोगस असल्याचे निदर्शनास आले. या कर्मचाऱ्यांवर कुठली कारवाई करायची, 
हा संबंधित विभागांचा अधिकार आहे. त्यानुसार त्यांनी निर्णय घेणे 
अपेक्षित आहे.
- ओम प्रकाश बकोरिया, आयुक्त, क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे.

हेच ते कर्मचारी
मयूर चव्हाण- अधिपरिचारक (उपसंचालक आरोग्य सेवा, औरंगाबाद), अमोल नाईकवाडे कृषी सेवक (विभागीय कृषी सहसंचालक, नागपूर), इरफान पठाण - लिपिक (विभाग नियंत्रक राज्य परिवहन, सोलापूर), दीपक दुनगहू - पोलीस शिपाई (मुंबई पोलीस), राजेंद्र राठोड - पोलीस शिपाई (मुंबई), अरुण जाधव - पोलीस शिपाई (मुंबई), महादेव घोडके -लिपिक (विभाग नियंत्रक राज्य परिवहन, पुणे), दत्ता दुधाटे - कृषी सहायक (डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला), गजानन दसारवाड - कृषी सेवक (नाशिक), राधेश्याम घोडके - कनिष्ठ लेखा परीक्षक (सहसंचालक स्थानिक निधी लेखापरीक्षक, कोकण विभाग), सुधीर बनकर - तलाठी (उपविभागीय अधिकारी, ठाणे), अनिल चव्हाण - शिक्षण सेवक (जि. प. रत्नागिरी), रवींद्र सावंत - गट शिक्षणाधिकारी (कोल्हापूर जिल्हा परिषद), वैशाली म्हस्के - शिक्षण सेवक (जि. प. रत्नागिरी), आशिष चव्हाण - शिक्षण सेवक (जि. प. रत्नागिरी), सचिन चौधरी - कक्ष सेवक (जिल्हा सामान्य रुग्णालय औरंगाबाद).

 

Web Title: Bogus sports certificates were given, 92 people lost their jobs!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.