मुंबई : अंबोलीमधील पेपरगळती प्रकरणात प्रशांत धोत्रे (२३) या बोगस पर्यवेक्षकाच्या मुसक्या मुंब्य्रामधून आवळण्यात एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक यांच्या पथकाला सोमवारी यश आले. पेपरफुटी प्रकरण उघडकीस आल्यापासून तो फरार होता.धोत्रे हा मुंब्य्रातील राहणारा असून ‘किड्स पॅरेडाइस’ शाळेचा उपमुख्याध्यापक आणि सध्या पोलिसांच्या ताब्यात असलेल्या फिरोज खानचा जवळचा मानला जातो. धोत्रे निव्वळ अकरावीपर्यंतच शिकलेला असल्याने त्याला कायद्याने पर्यवेक्षक बनविणे चुकीचे होते, असे पोलिसांचे म्हणणे आहे. मुंब्य्रातील ‘किड्स पॅरेडाइस’ शाळेत ज्या पाच पर्यवेक्षकांना फिरोजने आणले होते, त्यापैकी धोत्रे एक आहे. यानेच आयटीचा विद्यार्थी अन्वरुन हसन याला त्याच्या सॅमसंग मोबाइलमधून प्रश्नपत्रिका शेअर केल्याचे उघडकीस आले, अशी माहिती अंबोली पोलीस ठाण्याच्या विशेष पथकाचे प्रमुख आणि तपास अधिकारी दया नायक यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.‘२० मार्च रोजी पेपरफुटी प्रकरण उघडकीस आल्यानंतर फिरोजला अटक करण्यात आली. तेव्हापासून धोत्रे फरार होता. त्यामुळे आम्ही सतत त्याच्या मागावर होतो. या परिसरात आम्ही सापळा रचला होता. ज्यात धोत्रे फसला आणि आम्ही त्याच्या मुसक्या आवळल्या’, असेही नायक यांनी नमूद केले. पेपरफुटीसाठी धोत्रेने वापरलेला मोबाइल हस्तगत केल्याचेही ते म्हणाले.धोत्रेची अटक ही अंबोली पेपरगळती प्रकरणातील पाचवी अटक आहे. यापूर्वी पोलिसांनी फिरोझसह, इम्रान शेख, अन्वरून शेख आणि रोहित सिंग यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. साकीनाका पोलीसही या प्रकरणी अधिक चौकशी करत असून नव्याने कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. त्याला मंगळवारी न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.
अंधेरीतील पेपरगळती प्रकरणी बोगस पर्यवेक्षक गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2018 7:10 AM