‘ड्रग्ज रॅकेटर्स’ला उखडून टाका

By Admin | Published: February 7, 2016 12:19 AM2016-02-07T00:19:48+5:302016-02-07T00:19:48+5:30

मुंबई शहरातील रे रोड आणि पूर्व उपनगरातील गोवंडीसह लगतच्या परिसरात दिवसाढवळ्या सुरू असलेल्या अमलीपदार्थांच्या विक्रीचे वास्तव ‘लोकमत’ने स्टिंगद्वारे उघडकीस आणले.

Boil 'Drug Rackets' | ‘ड्रग्ज रॅकेटर्स’ला उखडून टाका

‘ड्रग्ज रॅकेटर्स’ला उखडून टाका

googlenewsNext

मुंबई : मुंबई शहरातील रे रोड आणि पूर्व उपनगरातील गोवंडीसह लगतच्या परिसरात दिवसाढवळ्या सुरू असलेल्या अमलीपदार्थांच्या विक्रीचे वास्तव ‘लोकमत’ने स्टिंगद्वारे उघडकीस आणले. या स्टिंगची दखल पोलीस यंत्रणेसह औषध आणि अन्न प्रशासनानेही घेतली. समाजातील प्रत्येक स्तराने याची दाखल घेत अशा रॅकेट्सची पाळेमुळे उखडून काढण्याची वेळ आल्याचे मत नोंदवले. समाजातील अशाच काही नामांकित व्यक्तींनी स्टिंगनंतर ‘लोकमत’कडे आपणहून मते मांडली. केईएमच्या मानसोपचार विभाग प्रमुख डॉ. शुभांगी पारकर म्हणाल्या, ड्रग्जच्या विळख्यातील चिमुरड्यांना यातून बाहेर काढण्यासाठी शाळा आणि घरांमधून व्यसनमुक्तीचे मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. विशेषत: पालक आणि शिक्षकांनी यासंबंधी पुढाकार घेऊन व्यसनमुक्तीचे कार्यक्रम, जनजागृतीपर व्याख्याने व पथनाट्य आयोजित केले पाहिजे. शिवाय, पालकांनी आपला पाल्य कोणाच्या संगतीत राहतोय, याकडेही विशेष लक्ष ठेवले पाहिजे. ड्रग्ज सेवनाच्या नावीन्यामुळे आणि ‘पिअर्स प्रेशर’मुळे आजची तरुण पिढी अमलीपदार्थांच्या आहारी जाते आहे. ड्रग्जचे व्यसन लागण्याचा कालावधी फार कमी असतो, त्यामुळे केवळ एक-दोनदा ड्रग्ज घेतले की त्याची सवय होऊन पुढे अ‍ॅडिक्शन होते. भावनिक अपरिपक्वतेमुळे तरुण पिढी अमलीपदार्थांच्या आहारी जाते, असे त्या म्हणाल्या. ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनची दखल घेऊन पोलीस प्रशासनाने स्थानिक पातळीवरील ड्रग्ज तस्करांवर कारवाई करावी, अशी मागणी निर्माण संस्थेच्या ज्योती सिंह यांनी केली. (प्रतिनिधी) पोलिसांचा कानाडोळा गेल्या अनेक वर्षांपासून गोवंडीतील शिवाजीनगर येथे ड्रग्जचा धंदा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. येथील स्थानिक पोलिसांना याची माहिती आहे. परंतु, ते कानाडोळा करीत आहेत. मी पोलीस आयुक्तांना या ठिकाणी सुरू असलेल्या ड्रग्जच्या धंद्यांची माहिती दिली होती. मात्र आयुक्तांकडून यावर प्रतिसाद आला नाही. उलट पोलिसांनी वर्षभरात केलेल्या कारवाईची यादी पाठवली. अशा प्रकारचे अड्डे गोवंडीत असल्यास माहिती देण्याचे पोलिसांनी सांगितले. यावर मी त्यांना परिसरातील माहिती दिली. काहीच कारवाई झाली नाही. - नितीन नांदगावकर, उपाध्यक्ष, मनसे वाहतूक सेना ड्रग्सवर नियंत्रण मिळवण्यासाठी एनडीएपीएस कायद्यात कठोर कारवाईची तरतूद केली पाहिजे. सुरुवातील मजा म्हणून ड्रग्सचे सेवन करणाऱ्या तरुण पिढीला त्यातून बाहेर निघणे अशक्य होते. यावर आळा घालण्यासाठी राज्य सरकारने कायद्यात कठोर तरतूद करणे आवश्यक आहे. बहुतांश वेळा कायद्यातील तांत्रिक बाबींमुळे ड्रग्ज विक्रेते किंवा ते बाळगणारे सुटतात. त्यामुळे पोलिसांनी ड्रग्जचे नमुने घेताना काळजी घ्यावी. त्याशिवाय कायद्यामध्येही अनेक तांत्रिक बाबींचा समावेश करण्यात येऊ नये. - उज्ज्वल निकम, विशेष सरकारी वकील व्यसनमुक्तीसाठी पोषक वातावरणनिर्मिती महत्त्वाची आहे. तसेच, ड्रग्जच्या सेवनातून गुन्हेगारीकडे वळणाऱ्या तरुणपिढीचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढते आहे. ड्रग्जच्या विळख्यात अडकलेल्या चिमुरड्यांसाठी विशेष लक्ष ठेवणाऱ्या संस्था कार्यरत होणेही तितकेच गरजेचे आहे. त्याचप्रमाणे, ‘मुंबई’ ड्रग्जची राजधानी म्हणून उदयास येते आहे, यावर ‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशनमधून टाकलेला प्रकाशझोत स्तुत्य आहे. या माध्यमातून संबंधित प्रशासनाने कारवाई करणे अपेक्षित आहे. - अनिल अवचट, ‘मुक्तांगण’ स्ंिटगने वस्तुस्थिती उघड आम्ही संस्थेतर्फे व्यसनमुक्तीचे मार्गदर्शन करतो. ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमधून मुंबई शहर-उपनगरांत दिवसेंदिवस व्यसनवाढीचे प्रमाण अधिक असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे लवकरच व्यसनमुक्तीचे जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करण्यात येतील. - नीलेश धुरी, जनआधार सामाजिक प्रतिष्ठान नशेसाठी औषधे : मुंबईसारख्या शहरात नशेसाठी औषधांचा वापर बेकायदेशीरपणे केला जातो. कोरेक्ससारखी खोकल्याची औषधे नशेसाठी वापरली जातात. ही माहिती अन्न व औषध प्रशासनाला आहे. त्यामुळे पोलिसांच्या मदतीने आम्ही अनेक ठिकाणी छापे टाकत असतो. ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनच्या ठिकाणीही कोरेक्ससारखी औषधे उपलब्ध असतील, तर त्या ठिकाणी आम्ही छापे टाकून कारवाई करू. - बी.आर. मासल, सहआयुक्त (औषध) अन्न व औषध प्रशासन अमलीपदार्थांची निर्यात कमी व्हावी मुंबईत अनेक ठिकाणी अमलीपदार्थांची खुलेआम विक्री होते. येथे तरुणांना आकर्षित करण्यासाठी विविध युक्त्या अमलीपदार्थ विक्रेते करीत असतात. त्यामुळे व्यसनाधिनता वाढते आहे. हे टाळण्यासाठी अमलीपदार्थांची निर्यात कमी झाली पाहिजे. दुसरे म्हणजे अमलीपदार्थांची मागणी कमी झाली पाहिजे. निर्यात रोखण्यासाठी पोलीस व स्थानिकांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे. दुसरीकडे डॉक्टरांनी तरुणाईला मानसिकरीत्या सक्षम बनवले पाहिजे. तरुण व्यसनांकडे वळल्यावर त्यांना तत्काळ त्या ‘ट्रॅप’मधून सोडण्यासाठी प्रयत्न सुरू झाले पाहिजेत. त्यांच्याशी संवाद साधून त्यांना व्यसनांपासून दूर ठेवले पाहिजे. तरुणाईला मानसिकदृष्ट्या सक्षम करण्याची आवश्यकता आहे. - डॉ. युसुफ माचिसवाला, मानसोपचार विभाग, जे.जे.

Web Title: Boil 'Drug Rackets'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.