मुंबई : हत्या करून मिठी नदीच्या किनारी फेकलेल्या तरुणाच्या हत्येचे गूढ उकलण्यात बीकेसी पोलिसांना शनिवारी यश आले. पोलिसांनी या मृत व्यक्तीची ओळख पटवून या प्रकरणी तीन जणांना अटक केली आहे.वांद्रे पूर्वेकडील बीकेसीमध्ये असलेल्या आयसीआयसीआय बँकेसमोर मिठी नदीच्या किनाऱ्यावर एक तरुण बेशुद्धावस्थेत पडला असल्याची माहिती ६ सप्टेंबरला पोलीस नियंत्रण कक्षाला मिळाली. घटनास्थळी पोहोचलेल्या बीकेसी पोलिसांनी या तरुणाला शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारांआधीच त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेची नोंद करून बीकेसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुंडलिक निगाडे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने तपास सुरू केला. तपास सुरू असतानाच तरुणाची हत्या करून मृतदेह या ठिकाणी फेकल्याचे डॅक्टरांनी दिलेल्या शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले. अहवालावरून याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला.मृताच्या अंगावरील खाकी गणवेशावरून तो रिक्षाचालक असल्याची शक्यता लक्षात घेऊन पोलीस मुंबईसह ठाणे, नवी मुंबई आणि पालघरमध्ये शोध घेत होते. त्यावेळी हा तरूण हा वाकोल्याच्या गावदेवी परिसरातील रविशंकर यादव असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यादिशेने तपास करत पोलिसांनी याच परिसरातून बाबू ठाकूर, अनिलकुमार सिंग (४०) आणि शिवबक्ष वर्मा उर्फ ननकू (३०) यांना हत्येच्या गुन्ह्याखाली अटक केली.रविशंकर याने केलेले रिक्षाचे नुकसान आणि उधारीच्या पैशांतून त्याच्या हत्येचा कट आखण्यात आला. तिन्ही आरोपींनी रविशंकरला अनिलकुमारच्या घरी बोलावून लाथाबुक्क्यांनी मारहाण करत समोसे बनविण्याच्या झाऱ्याने प्रहार करून त्याची हत्या केली आणि त्याचा मृतदेह मिठी नदीत फेकल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)
बीकेसीतील हत्येचे गूढ उकलले
By admin | Published: September 11, 2016 3:11 AM