बोईसरच्या वरुणची यूपीएससीत बाजी
By admin | Published: June 14, 2014 11:46 PM2014-06-14T23:46:02+5:302014-06-14T23:46:02+5:30
प्रतिकूल परिस्थितीवर मात करून बोईसरच्या वरूण बरणवान या तरूणाने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या २०१३ या वर्षी घेतलेल्या परीक्षेत देशात ३२ वा तर महाराष्ट्र राज्यात तिसरा येण्याचा बहुमान मिळविला आहे.
पंकज राऊत, बोईसर
शैक्षणिक कालावधीतील अत्यंत महत्वाच्या अशा दहावी (एस.एस.सी.) मध्ये असतानाच वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर प्रतिकूल परिस्थितीवर मात करून बोईसरच्या वरूण बरणवान या तरूणाने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या २०१३ या वर्षी घेतलेल्या परीक्षेत देशात ३२ वा तर महाराष्ट्र राज्यात तिसरा येण्याचा बहुमान मिळविला आहे.
वरूणच्या वडिलांचे बोईसर येथील शिवानंद हॉटेल समोरील एका झाडाखाली सायकल दुरूस्तीचे दुकान होते. या दुकानावर पत्नीसह पाच मुलांचा संसाराचा गाडा चालवित असतानाच २३ मार्च २००६ रोजी वडिलांचे निधन झाले. वडिलांच्या निधनानंतर वरूणची आई व भावाने एका गाळ्यात सायकलच्या दुकानाचा व्यवसाय सुरूच ठेवला . वेळप्रसंगी वरूणनेही दुकानात आईला मदत केली. त्याच सायकलच्या दुकानात काम करता-करता त्याने अभ्यासालाही तेवढेच प्राधान्य दिले. सीटीएसईएस् या शाळेत त्याने ८९ टक्के गुण मिळवुन प्रथम क्रमांक पटकावला तर तारापूर विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालयातून ८३ टक्के (पीसीएम ९६ टक्के) गुण मिळविले.
आयुष्यात काहीतरी करायचे. भरपूर शिक्षण घ्यायचे ही जिद्द बाळगून वरूणने पुण्यातील एम.आय.टी. अभियांत्रिक विद्यालयात प्रवेश घेतला. यावेळी प्रथम वर्षाची फी भरण्याकरीता वरूणला काका व मित्रांनी आर्थिक मदतीचा हात दिला तर वरूणने पुढील शिक्षण हे शिष्यवृत्तीवरच पूर्ण केले. २०१२ मध्ये इलेक्ट्रॉनिक्स् अँड टेलिकम्युनिकेशन अभ्यासक्रमात पुणे विद्यापीठातून पहिला क्रमांकाने उत्तीर्ण होऊन सुवर्णपदकही मिळविले.
त्याच दरम्यान वरूणने आय्.ए.एस. होण्याचा निश्चय केला आर्थिक चणचण तर होतीच तरीही वरूण न डगमगता त्याने पुण्यातील चाणक्य मंडळ परिवाराच्या कोचिंग क्लासमध्ये प्रवेश घेऊन जिद्दीने अभ्यास सुरू करून तेथेही शिष्यवृत्ती मिळविली. पुण्यात पेर्इंग गेस्ट राहून युपीएससीचा अभ्यास केला. त्यावेळी ही सुट्टीत बोईसरच्या घरी यायचा तेव्हा सायकलच्या दुकानात आईला मदत करायचा. इच्छा असेल तर मार्ग सापडतो, जिद्द बाळगळी तर यश मिळते मग परिस्थिती कितीही प्रतिकूल असो हेच वरूणने मिळविलेल्या यशाने सर्वांना दाखवून दिले आहे.