बोईसर यार्डात ब्लॉक, लोकल सेवेवर परिणाम; रविवारी पश्चिम रेल्वेवर जंबो ब्लॉक
By सचिन लुंगसे | Published: April 5, 2024 07:56 PM2024-04-05T19:56:10+5:302024-04-05T19:56:32+5:30
ब्लॉकमुळे पश्चिम रेल्वेच्या काही गाड्या अंशत: रद्द करण्यात आल्या आहेत.
मुंबई : बोईसर यार्ड येथे विभागीय वेग १६० किमी प्रतितास वाढविण्याचे काम पूर्ण करण्यासाठी ७ एप्रिल रोजी पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. बोईसर यार्ड येथे अप आणि डाउन दोन्ही मुख्य मार्गावर सकाळी १० ते १०.५० पर्यंत ब्लॉक घेण्यात येईल. ब्लॉकमुळे पश्चिम रेल्वेच्या काही गाड्या अंशत: रद्द करण्यात आल्या आहेत. ट्रेन क्रमांक ९३००९ चर्चगेट - डहाणू रोड ही चर्चगेट येथून ७.४२ वाजता सुटणारी लोकल पालघर आणि डहाणू रोड दरम्यान अंशतः रद्द असेल. गाडी क्रमांक ९३०१० डहाणू रोड - चर्चगेट ही डहाणू रोडवरून ९.३७ वाजता सुटणारी लोकल डहाणू रोड आणि पालघर दरम्यान अंशतः रद्द असेल.
रविवारी पश्चिम रेल्वेवर जंबो ब्लॉक
पश्चिम रेल्वेवरील ट्रॅक, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीच्या कामासाठी माहीम आणि अंधेरी स्थानकांदरम्यान अप आणि डाउन हार्बर मार्गांवर ७ एप्रिल रोजी सकाळी ११ ते ४ वाजेपर्यंत पाच तासांचा जंबो ब्लॉक घेण्यात येईल. ब्लॉक कालावधीत मध्य रेल्वेच्या सर्व सीएसएमटी-वांद्रे-सीएसएमटी आणि सीएसएमटी-गोरेगाव-सीएसएमटी हार्बर लाईन सेवा आणि चर्चगेट ते गोरेगाव दरम्यान काही धीम्या मार्गावरील सेवा रद्द करण्यात आल्या आहेत.