बोलीभाषा एकांकिका स्पर्धा जाहीर; महाराष्ट्रातील बोलींना प्राधान्य देणारी स्पर्धा; ५ ते ७ जानेवारीला प्राथमिक फेरी
By संजय घावरे | Published: October 11, 2023 05:04 PM2023-10-11T17:04:24+5:302023-10-11T17:05:25+5:30
नाटककार गंगाराम गवाणकर यांच्या संकल्पनेला नाट्यनिर्माते गोविंद चव्हाण यांनी मूर्त रुप दिल्याने २०१६पासून ही स्पर्धा सुरु झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क,
मुंबई - मराठी नाट्यवर्तुळातल्या महत्वाच्या आणि विशेष एकांकिका स्पर्धांपैकी एक असलेल्या सुप्रिया प्रॉडक्शन्स आणि व्हिजन व्हॉईस एन ऍक्ट आयोजित 'बोलीभाषा एकांकिका स्पर्धे'च्या प्राथमिक फेरीचा बिगुल वाजला आहे. ५ ते ७ जानेवारी २०२४ या कालावधीत या स्पर्धेची प्राथमिक फेरी आणि १२ जानेवारीला अंतिम फेरी दादरमध्ये होणार आहे.
नाटककार गंगाराम गवाणकर यांच्या संकल्पनेला नाट्यनिर्माते गोविंद चव्हाण यांनी मूर्त रुप दिल्याने २०१६पासून ही स्पर्धा सुरु झाली. ५ ते ७ जानेवारीमध्ये कुर्ला-नेहरुनगर येथील प्रबोधन प्रयोग घरामध्ये या स्पर्धेची प्राथमिक फेरी होईल. स्पर्धेचे नियम व प्रवेश अर्ज सुप्रिया प्रोडक्शनच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. गेल्या सहा वर्षांमध्ये महाराष्ट्रभरातील वेगवेगळ्या बोलींमधून २४९ संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले आहेत. या स्पर्धेतील विजेत्यांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल.
प्रथम चार सांघिक विजेत्यांसाठी अनुक्रमे २५०००, २००००, १५००० व ५००० अशी पारितोषिके दिली जातील. प्रथम पारितोषिक विजेत्या संघाला नटश्रेष्ठ गोपीनाथ सावकार पुरस्काराने गौरवण्यात येणार असून हे पारितोषिक अभिनेते अशोक सराफ व त्यांचे बंधू सुभाष सराफ यांनी पुरस्कृत केले आहे. अन्य पारितोषिकांमध्ये लेखन, दिग्दर्शन, नेपथ्य, प्रकाश, पार्श्वसंगीत, रंगभूषा, वेशभूषा, विनोदी लेखन, विनोदी अभिनय, वाचिक अभिनय, व्यवस्थापन या सर्वच घटकांसाठी पारितोषिके आहेत.