मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचे शनिवारी रात्री हृदयविकाराच्या धक्क्याने दुबईत निधन झाले. त्या 54 वर्षांच्या होत्या. श्रीदेवी आपल्या कुटुंबीयांसह दुबईत एका लग्न समारंभासाठी गेल्या होत्या. त्यावेळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पती बोनी कपूर आणि दोन मुली असा परिवार आहे. त्यांच्या अकाली निधनामुळे बॉलिवूड आणि चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.
श्रीदेवी यांनी बॉलिवूडमध्ये अभिनय, सौंदर्य आणि नृत्याविष्काराने स्वतःचा वेगळा असा ठसा उमटवला आहे. त्यांनी अभिनयाची सुरुवात लहान असतानाच सुरु केली होती. 1978 साली सोलावा सावन या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी आतापर्यंत अनेक चित्रपटांत काम केले आहे. बॉलिवूडमधील सदमा, नागिन, निगाहें, मिस्टर इंडिया, चालबाज, लम्हे, खुदा गवाह, जुदाई अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांमधून त्यांनी भूमिका साकारल्या. याचबरोबर, त्यांनी हिंदी चित्रपटांसह तमीळ, तेलगू, मल्याळम, कन्नड चित्रपटांमध्ये सुद्धा काम केले.
निर्माते, दिग्दर्शक बोनी कपूर यांच्यासोबत विवाहबद्ध झाल्यानंतर जुदाई चित्रपटाचा अपवाद वगळता श्रीदेवी चित्रपटसृष्टीपासून दूर होत्या. त्यानंतर सहा वर्षानंतर श्रीदेवी यांनी मिसेस मालिनी अय्यर या मालिकेतून छोट्या पडद्यावर एंट्री केली. त्यानंतर 2012 साली आलेल्या 'इंग्लिश-विंग्लिश' या चित्रपटातून श्रीदेवी यांनी बॉलिवूडमध्ये पुनरागमन केले. अभिनय क्षेत्रात उत्तम कामगिरी केल्याबद्दल श्रीदेवी यांनी भारत सरकारकडून पद्मश्री या पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
श्रीदेवी यांचे काही गाजलेले चित्रपट....जुली, सोलावा सावन, सदमा, हिम्मतवाला, जाग उठा इन्सान, अक्लमंद, इंकलाब, तोहफा, सरफ़रोश, बलिदान, नया कदम, नगीना, घर संसार, नया कदम,मकसद, सुल्तान, आग और शोला, भगवान, आखरी रास्ता,जांबांज, वतन के रखवाले, जवाब हम देंगे, औलाद, नज़राना,कर्मा, हिम्मत और मेहनत, मिस्टर इंडिया, निगाहें, जोशीले ,गैर क़ानूनी,चालबाज,खुदा गवाह, लम्हे, हीर राँझा, चांदनी, रूप की रानी चोरों का राजा, चंद्रमुखी, चाँद का टुकड़ा,गुमराह,लाडला, आर्मी, जुदाई, हल्ला बोल, इंग्लिश विंग्लिश.
श्रीदेवी यांच्यासोबत पती बोनी कपूर आणि मुलगी खुशी दुबईला गेलो होते. मात्र, दुसरी मुलगी जान्हवी कपूर चित्रीकरणात व्यस्त असल्यामुळे दुबईत गेली नव्हती. श्रीदेवी यांच्या मुंबई येथील घरी नातेवाईकांसह बॉलिवूडमधील लोक पोहोचण्यास सुरूवात झाली असून जानव्ही कपूरचे सांत्वन करण्यात येत आहे.
श्रीदेवी यांच्या निधनाची बातमी समजताच बॉलिवूड आणि सोशल मीडियात शोक व्यक्त करण्यात येत आहे.