मुंबई : डेंग्यूचा मुंबईला विळखा पडलेला असतानाच यातून आता बॉलिवूड कलाकारांचे घरही सुटलेले नाही. अभिनेता अनिल कपूर, जुही चावला, गायक अमित कुमार या बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरातच डासांची उत्पत्तीस्थाने आढळली आहेत. डेंग्यूला थोपवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून त्याची उत्पत्तीस्थाने शोधण्यात येत असून त्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेदरम्यान बॉलिवूड कलाकारांच्या घरीही डेंग्यूच्या डासांची उत्पत्तीस्थाने आढळली आहेत. पालिकेकडून बॉलिवूडमधील बिग बी अमिताभ बच्चन, अनिल कपूर, जीतेन्द्र, जुही चावला, शबाना आझमी, अमित गांगुली यांच्या घरांची तपासणी करण्यात आली असता अमिताभ बच्चन व शबाना आझमी वगळता अन्य कलाकारांच्या घरी डासांची उत्पत्तीस्थाने आढळली. त्यामुळे या कलाकारांना पालिकेकडून नोटीस बजावण्यात आल्याचे सांगण्यात आले.
झोपडपट्टीत नव्हे तर इतर ठिकाणी जास्त प्रमाणात डेंग्यूच्या डासांची पैदास होत असल्याचे आधीच स्पष्ट झाले होते. १ ते १६ सप्टेंबर या कालावधीत पाहणी केलेल्या चाळींपैकी १ हजार ६४८ घरांतच डेंग्यूच्या डासांची पैदास होत असल्याचे उघड झाले आहे. यामुळे मुंबईकर माहिती असूनही निष्काळजीपणा करून स्वत:चे आरोग्य धोक्यात घालत असल्याचे स्पष्ट झाले आहे. साचलेल्या पाण्यात डेंग्यू, मलेरियाच्या डासांची पैदास होते. सात दिवसांहून अधिक काळ पाणी साठून राहिल्यास डासांची वाढ पूर्ण होते. डासांची पैदास रोखण्यासाठी पाणी साठू देऊ नका, असे आवाहन महापालिकेने मुंबईकरांना केले होते. पण गेल्या वर्षीप्रमाणे तीच स्थिती असल्याचे हळूहळू स्पष्ट होत आहे. गेल्या वर्षी आढळलेल्या डेंग्यूच्या रुग्णांपैकी ८० टक्के रुग्णांच्या घरातच अथवा घराच्या आजूबाजूच्या परिसरात डेंग्यूच्या डासांची पैदास होत असल्याचे आढळून आले होते.सप्टेंबर आणि आॅक्टोबर महिन्यात डेंग्यूचे रुग्ण वाढतात. सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यात एकाचा डेंग्यूमुळे मृत्यूही झाला. यामुळे महापालिका सक्रिय झाली आहे. १६ दिवसांमध्ये महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी एकूण ११ हजार १५ चाळींची तपासणी केली. या चाळींमधील ५ लाख ४३ हजार ८६६ घरांची तपासणी केली असून, ४ लाख ६५ हजार ८८१ पाण्याच्या टाक्या, पाणी साठवलेल्या ठिकाणांची पाहणी केली. यापैकी १ हजार ६४८ पाणी साठवलेल्या ठिकाणी डेंग्यूच्या डासांची पैदास झाल्याचे उघड झाले आहे.अतिशय कोपऱ्यात अथवा अत्यंत कमी पाणी साठून राहिले असले तरीही तिथे डेंग्यूच्या डासांची पैदास होऊ शकते. अनेक ठिकाणी पाण्याच्या टाक्या, पिंप यावर झाकण असले तरी थोडीशी फट असते. या फटीतून डास आत जाऊ शकतात. या छोट्या गोष्टींकडे लक्ष दिल्यास डेंग्यूच्या डासांची पैदास रोखता येऊ शकते. नागरिकांनी सतर्क राहिले पाहिजे, असे साथरोग नियंत्रण कक्षाच्या प्रमुख डॉ. मिनी खेत्रपाल यांनी सांगितले.यामुळे नागरिकांनी दक्ष राहण्याची आवश्यकता आहे. घरातील मनीप्लॅण्ट, फेंगशुईच्या वस्तू, झाडांच्या खाली ठेवण्यात आलेल्या ताटल्या, फ्रीज, एसी या ठिकाणी पाणी साचते. या ठिकाणी विशेष लक्ष दिले पाहिजे. याचबरोबरीने ताडपत्र्या, टायर, अडगळीच्या वस्तूंमध्ये पाणी साचते. येथेही लक्ष ठेवावे, असे आवाहन पालिका नागरिकांना करीत आहे. (प्रतिनिधी)