बॉलीवूडची टक्कर ‘मोदी’ लाटेशी; लोक‘मता’चा कौल कुणाला?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 02:29 AM2019-04-12T02:29:25+5:302019-04-12T02:29:35+5:30
मनसे ‘फॅक्टर’ भाजपची डोकेदुखी ठरणार...
उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी यांच्या विरोधात काँग्रेसच्या उमेदवार ऊर्मिला मातोंडकर यांनी दंड थोपटले आहेत. महत्त्वाचे म्हणजे ऊर्मिला यांना बॉलीवूडचे वलय आहे; आणि ही त्यांची जमेची बाजू आहे. असे असले तरीदेखील गोपाळ शेट्टी यांचा दांडगा जनसंपर्क ही शेट्टी यांची जमेची बाजू आहे. शेट्टी यांनी कार्यकर्ता ते खासदार असा प्रवास करत मोठा पल्ला गाठला आहे. दरम्यान, याच मतदारसंघात अभिनेता गोविंदा यांचा विजय विसरता येणार नाही. शेट्टी हे ऊर्मिला यांचा सामना कसा करतात? आणि ‘लोक’मताचा कौल कुणाला जातो? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने बॉलीवूड अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. ऊर्मिला यांनी आपला प्रचार आणि प्रसार तळागाळात सुरू केला आहे. रिक्षावाल्यापासून चप्पलवाल्याच्या गाठीभेटी घेत एक सर्वसामान्य कार्यकर्त्या म्हणून त्या वावरत आहेत. नाही म्हटले तरी त्यांची गाठ स्वत:लाही कार्यकर्ता म्हणून घेत असलेल्या गोपाळ शेट्टी यांच्याशी आहे. परिणामी, दोघांमध्ये जंगी सामना रंगणार असून, यात उत्तरोत्तर रंगत येणार असल्याने कोण कोणाला पाणी पाजणार? हे पाहणेदेखील तेवढेच महत्त्वाचे आहे.
मागील लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेचा फायदा झाला होता. या वर्षी होईल, असे वाटते का?
मोदी हे २०१४ साली देशाचे नेते होते. आणि आता ते आंतरराष्ट्रीय नेते म्हणून उदयास आले आहेत. ‘मोदी’जींची लाट होती आणि राहणारच. आता राहुल गांधी यांना अमेठी सोडून वायनाड येथून निवडणूक का लढवावी लागत आहे?
मागील वर्षी मोठ्या मतांच्या फरकाने तुम्ही विजयी झाला होता. या वर्षी बॉलीवूडचे आव्हान आहे?
या वर्षी मी अधिक मतांनी निवडून येणार आहे. नागरिकांचा मी केलेल्या कामावर विश्वास आहे, असे मला वाटते.
निवडणुकीत विरोधकांना मोदी लाटेचा फायदा होईल?
मला असे वाटते की मोठी व्यक्ती त्या व्यक्तीला म्हटले पाहिजे ज्या व्यक्तीने मोठी कामे केली आहेत. कर्तव्यांची यादी मोठी पाहिजे. माणूस कामाने मोठा पाहिजे.
समस्या सुटलेल्या नाहीत; यावर काय म्हणाल?
नागरिक समस्या मांडत आहेत. नागरिक फोटो पाठवत आहेत. अशा समस्यांचे फोटो येत आहेत; ज्या समस्या कधीही सोडविण्यात आलेल्या नाहीत. ज्याकडे कधीही लक्ष देण्यात आलेले नाही. मला हा असा वेगळा अनुभव येत आहे. नागरिक मला भेटून समस्यांचा पाढा वाचत आहेत़ त्यांना न्याय देण्याचा मी प्रयत्न करेऩ
शिवसेनेच्या सहकार्याविषयी तुमची भूमिका काय आहे?
भारतीय जनता पक्षामध्ये कोणत्याही प्रकाराचा अंतर्गत वाद नाही. शिवसेना हा आमचा मित्र पक्ष आहे. त्यांचाही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद आमच्यावर कायम आहेत आणि भविष्यातही कायम राहतील. परिणामी, आमच्यात अंतर्गत वाद नसल्याच्या कारणात्सव यावर बोलणे योग्य नाही, असेही मला वाटते.
जाहीरनाम्यात कोणत्या मुद्द्यांना अधोरेखित करणार?
पक्षाचा जाहीरनामा सविस्तर आणि विचार करून मांडण्यात आला आहे. तज्ज्ञांशी बोलून पक्षाने हा जाहीरनामा तयार केला आहे. याच्याशी जवळीक साधणारे मुद्दे माझे असणार आहेत. न्याय आणि योजनेचा मुद्दा आहे. मुंबईशी जुळलेले अनेक मुद्दे आहेत. झोपड्यांच्या पुनर्विकासाचा मुद्दा मोठा आहे. शिक्षण आणि महिला आरोग्य या विषयावर मी अधिक लक्ष देत आहे. कारण या मुद्द्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.
नेत्याला कायम पद मिळते. कार्यकर्त्यांवर अन्यायच होतो?
आमच्या पक्षात सर्वसामान्य चहावाला देशाचा पंतप्रधान बनू शकतो आणि झोपडीमध्ये राहणारा माझ्यासारखा माणूस खासदारकी मिळवू शकतो. हा प्रश्न काँग्रेस पक्षाला विचारण्याची गरज असल्याने तुम्ही हा प्रश्न त्यांना विचारा.