मुंबई: भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या निधानाने संपूर्ण जगभर हळहळ व्यक्त केली जात आहे. लता दीदींच्या जाण्यानं देशात दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. अनेकविध क्षेत्रातील मान्यवर, दिग्गज, कलाकारमंडळी लता दीदींच्या प्रभुकुंज या निवासस्थानी जाऊन अंतिम दर्शन घेत आहेत. यातच बॉलिवूडचे महानायक बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी आपल्या भावना लता मंगेशकर यांच्या निधनावर व्यक्त केल्या आहेत.
महानायक बिग बी अमिताभ बच्चन यांनी हळहळ व्यक्त करत अतीव दुःख झाल्याचे म्हटले आहे. अमिताभ बच्चन आणि लता मंगेशकर यांचे नाते विशेष होते. एकमेकांच्या सुख दु:खात ते सहभागी होत असत. लदादीदींबद्दल अमिताभ बच्चन यांच्या मनात कमालीचा आदर होता. अनेकवेळा सार्वजनिक कार्यक्रमांमधून महानायक अमिताभ बच्चन यांनी तो व्यक्तही केला होता. त्यांच्या एकमेकांसोबतच्या अनेक चांगल्या आठवणी आहेत. अमिताभ बच्चन यांना दीनानाथ मंगेशकर पुरस्कारही देण्यात आला होता.
शतकांचा आवाज हरपला, अतीव दुःख
शतकांचा आवाज हरपला, आता स्वर्गातही लतादीदींचा आवाज रुंजी घालेल. लता मंगेशकर यांच्या जाण्याने मला अतिव दु:ख होतंय. त्या आज आपल्याला सोडून निघून गेल्या आहेत. गेली ९० वर्ष त्यांनी भारतीयच नव्हे तर जगभरातील रसिकांची सेवा केली. त्या दिदी आज आपल्यात नाहीत. आता त्यांचा अवीट सूर स्वर्गातही रुंजी घालेल. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो, असे अमिताभ बच्चन यांनी म्हटले आहे.
दरम्यान, लता मंगेशकर यांचा जन्म २८ सप्टेंबर रोजी १९२९ रोजी झाला. लता मंगेशकरांनी ३६ भाषांमध्ये तब्बल ५० हजार गाणी गायली आहेत. हा एक रेकॉर्ड गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आलेला आहे. गेल्या २८ दिवसांचा लता मंगेशकरांचा संघर्ष संपला. लतादीदींच्या जाण्याने भारतीय संगीतसृष्टीतील एका पर्वाचा अंत झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.