मुंबई – बॉलिवूड, ड्रग्स आणि कंगना राणौत सध्या सगळीकडे याच गोष्टींची चर्चा आहे. अभिनेता सुशांत सिंग राजपूत मृत्यूनंतर बॉलिवूडच्या घराणेशाहीवर आरोप करण्यात आले. त्यानंतर कंगनानं बॉलिवूडच्या पार्ट्यांमध्ये ड्रग्सचा वापर होतो असा आरोप केला. त्यानंतर कंगनाच्या या आरोपांवर काहींनी समर्थन केले तर काहींनी विरोध केला.
बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना दिली जाणारी वागणूक नेहमीच चर्चेचा विषय ठरली आहे.अशातच बॉलिवूडमधील प्रसिद्ध मराठी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिने गौप्यस्फोट केला आहे. बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना मराठी म्हणून नव्हे तर घाटी म्हणून संबोधलं जातं. “घाटी लोगो को हिंदी भी नही आती”, ये क्या घाटी कपडा पहना है, उनके हिंदी को घाटी बदबू आ रही है अशा शब्दात हिणवलं जातं. बॉलिवूडमध्ये ही वस्तूस्थिती यापूर्वीही होती आणि आताही आहे असं तिने सांगितले आहे. एबीपी माझाच्या कार्यक्रमात ती बोलत होती.
उर्मिलाचा कंगनावरही निशाणा
कंगनावर चर्चा करावी, तिच्याविषयी बोलावे, असं मला वाटत नाही हे उर्मिलाने म्हटलं आहे. तसेच, या मॅडमला वाय प्लस दर्जाची सुरक्षा पुरविण्यात आली, याचा पैसा कोण देतं. तुमच्या आमच्यासारखा टॅक्स पेयर माणूसचं तिच्या सुरक्षेचा खर्च उचलतोय. तिने क्लेम केला होता की, माझ्याकडे माफियांची नावे असून ती मला नार्को टेस्ट डिपार्टमेंटकडे द्यायची आहेत, असं म्हणून तिने सुरक्षा मागितली. मात्र, तिला हे नावं द्यायची होती तर, तिने मेलवरुन, टेक्नॉलॉजी वापरुन ती द्यायला हवी होती. त्यासाठी, येथे येण्याची काय गरज? ती चिथवण्यासाठीच मुंबईत आली होती, असे उर्मिला मांतोडकर यांनी म्हटलंय. विशेष म्हणजे तिने नावं दिली का? त्यातून काय झालं का? असा सवालही उर्मिला मातोंडकरनं विचारला आहे. ज्या इंडस्ट्रीने तुम्हाला घडवलं, त्या इंडस्ट्रीला तुम्ही बदनाम करताय, ही घाण आहे, असं म्हणत उर्मिला यांनी कंगनावर सडेतोड मते मांडली आहे.
मुंबईला पीओके म्हटल्यानंतरही कंगनाला सुनावलं होतं.
कंगना राणौतनं शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर टीका करताना मुंबई पीओके असल्यासारखी वाटतेय असं विधान केले होते. या विधानावरुन अनेकांनी तिच्यावर संताप व्यक्त केला होता. त्यावेळी उर्मिला मातोंडकरनं ट्विट करत म्हटलं होतं की,''महाराष्ट्र हा भारताचा सांस्कृतिक आणि बौद्धिक चेहरा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची ही भूमी आहे. मुंबईनं कोट्यवधी भारतीयांना नाव, प्रसिद्धी मिळवून दिली. केवळ कृतघ्न लोकंच मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करू शकतात... हे धक्कादायक आहे अशा शब्दात उर्मिलानं कंगानला फटकारलं होतं.