बाॅलीवूड मुंबईतच राहील, आम्ही जागतिक फिल्मसिटी उभारतोय - योगी आदित्यनाथ 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2020 04:50 AM2020-12-03T04:50:31+5:302020-12-03T07:33:43+5:30

उत्तर प्रदेशातील गुंतवणूक वाढावी, तसेच प्रस्तावित फिल्म सिटीसंदर्भात सिनेजगतातील मान्यवरांशी चर्चा करण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आले होते.

Bollywood will remain in Mumbai, we are building a global film city - Yogi Adityanath | बाॅलीवूड मुंबईतच राहील, आम्ही जागतिक फिल्मसिटी उभारतोय - योगी आदित्यनाथ 

बाॅलीवूड मुंबईतच राहील, आम्ही जागतिक फिल्मसिटी उभारतोय - योगी आदित्यनाथ 

Next

मुंबई : मुंबईतील बाॅलीवूड इथेच राहणार आहे. आम्ही काहीही घेऊन जायला आलो नाही. आम्ही तर उत्तर प्रदेशात जागतिक दर्जाची नवी फिल्म सिटी उभारत आहोत. त्यामुळे तुम्ही का इतके चिंतित झाला आहात, असा खोचक प्रश्न उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बुधवारी महाविकास आघाडीतील नेत्यांना केला.

उत्तर प्रदेशातील गुंतवणूक वाढावी, तसेच प्रस्तावित फिल्म सिटीसंदर्भात सिनेजगतातील मान्यवरांशी चर्चा करण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आले होते. उद्योग आणि सिनेजगतातील मंडळींशी चर्चेनंतर माध्यमांशी बोलताना योगी आदित्यनाथ यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विशेषतः काँग्रेस आणि शिवसेना नेत्यांनी योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यावर टीका केली होती. हा मुंबईतील बाॅलीवूड पळविण्याचा प्रकार असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांना केला होता. यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करताना आदित्यनाथ म्हणाले, कोणीही काहीही घेऊन जायला आलेले नाही. कोणीही न्यायला ती काही कुणाची पर्स नाही. जिथे सुरक्षित वातावरण मिळेल, सामाजिक सुरक्षा असेल, भेदभाव नसेल तिथे लोक जातील. काळानुरूप सुविधा आणि वातावरण उत्तर प्रदेशातील फिल्म सिटीमध्ये निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. याच संदर्भात सिनेजगतातील दिग्गजांशी चर्चा केल्याचेही त्यांनी सांगितले.

आम्हाला कोणाची गुंतवणूक पळवायची नाही किंवा कोणाच्या विकासात बाधा निर्माण करायची नाही. देशाच्या आर्थिक विकासात आम्ही आमचे योगदान देण्याचा प्रयत्न करीत आहोत. विकासासाठी, गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी नेतृत्वाची नीती साफ असायला हवी. सरकारबद्दल विश्वास हवा, सरकार स्थिर असणेही महत्त्वाचे आहे. या बाबी असतील तर आपोआप गुंतवणूकदार तुमच्याकडे आकर्षित होतील, असा टोलाही त्यांनी लगावला.

‘मोठा विचार करावा लागेल’
आम्ही नवीन जागतिक दर्जाची फिल्म सिटी उभारतोय, असे सांगतानाच देशाच्या विकासातील आपले योगदान वाढविण्यासाठी मोठे व्हावे लागेल, मोठा विचार करावा लागेल. जे चांगल्या सुविधा देतील तिकडे लोक जातील आणि त्यासाठी उत्तर प्रदेश तयार असल्याचे योगी आदित्यनाथ म्हणाले. 

Web Title: Bollywood will remain in Mumbai, we are building a global film city - Yogi Adityanath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.