Join us

उच्च न्यायालयात ‘बॉम्ब’बोंब, बॉम्बचा फोन ठरला खोटा,मनोरुग्णाचा प्रताप असल्याचा संशय  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 4:05 AM

उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती मंजुळा चेल्लूर यांचे सचिव श्रीराम जोशी यांच्या चेंबरमध्ये बॉम्ब ठेवल्याच्या अफवेने, बुधवारी सकाळी खळबळ उडाली. पोलिसांसह बॉम्बशोधक पथके तेथे तैनात झाली. तब्बल दोन ते अडीच तासांच्या तपासणीत तेथे काहीही आढळून आले नाही.

मुंबई : उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती मंजुळा चेल्लूर यांचे सचिव श्रीराम जोशी यांच्या चेंबरमध्ये बॉम्ब ठेवल्याच्या अफवेने, बुधवारी सकाळी खळबळ उडाली. पोलिसांसह बॉम्बशोधक पथके तेथे तैनात झाली. तब्बल दोन ते अडीच तासांच्या तपासणीत तेथे काहीही आढळून आले नाही. यामागे एक मनोरुग्ण आरोपी असल्याची शक्यता पोलिसांना आहे. त्यानुसार, आझाद मैदान पोलीस अधिक तपास करत आहेत.पोलीस उपायुक्त मनोज शर्मा यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी ९ च्या सुमारास पोलीस नियंत्रण कक्षास कॉल आला. संबंधित तरुणाने उच्च न्यायालयाच्या ५१ क्रमांकाच्या चेंबरमध्ये बॉम्ब ठेवला असून, थोड्याच वेळात स्फोट घडविला जाईल, अशी माहिती दिली. नियंत्रण कक्षातून माहिती मिळताच, स्थानिक पोलिसांसह बॉम्बशोधक पथक तेथे दाखल झाले. या चेंबरमध्ये न्यायमूर्ती मंजुळा चेल्लूर यांचे सचिव श्रीराम जोशी बसतात. त्यांच्या चेंबरला लागूनच न्यायमूर्ती चेल्लूर यांचे कोर्टरूम आहे.घटनेचे गांभीर्य लक्षात घेत, उच्च न्यायालयाबाहेरील सुरक्षेत वाढ करण्यात आली. बॉम्बशोधक पथकाने संपूर्ण परिसर पिंजून काढला. मात्र, तपासणीत बॉम्ब किंवा बॉम्बसदृश्य कोणतीही वस्तू सापडली नसल्याचे शर्मा यांनी सांगितले.मंगळवारी न्यायमूर्ती चेल्लूरही कोर्टरूममध्ये आल्या नव्हत्या. हा खोटा कॉल असल्याचे पोलिसाचे म्हणणे आहे. तब्बल दोन ते अडीच तासांच्या तपासणीनंतर पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला. या प्रकरणी आझाद मैदान पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे, तसेच हा कॉल एका मनोरुग्ण आरोपीने केला असल्याचा संशय आहे. त्याने यापूर्वीही असे कॉल केले आहेत. त्या दिशेने अधिक तपास सुरू असल्याचेही शर्मा यांनी सांगितले.

टॅग्स :मुंबई हायकोर्टन्यायालयमुंबई