माझ्या बॅगेत बॉम्ब! अकासा विमानाचे मुंबईत करावे लागले इमर्जन्सी लॅण्डिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2023 12:02 PM2023-10-22T12:02:13+5:302023-10-22T12:04:11+5:30

नातेवाईक म्हणाला, छातीत दुखल्याचे औषध घेतल्याने बरळला

bomb in my bag akasa plane had to make an emergency landing in mumbai | माझ्या बॅगेत बॉम्ब! अकासा विमानाचे मुंबईत करावे लागले इमर्जन्सी लॅण्डिंग

माझ्या बॅगेत बॉम्ब! अकासा विमानाचे मुंबईत करावे लागले इमर्जन्सी लॅण्डिंग

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : पुण्याहून दिल्लीसाठी अकासा कंपनीच्या विमानाने शुक्रवारी मध्यरात्री उड्डाण केले आणि काही मिनिटांतच एका प्रवाशाने त्याच्या बॅगेत बॉम्ब असल्याची ओरड विमानात केली. त्यानंतर वैमानिकाने तातडीने मुंबई विमानतळावर आपत्कालीन लॅण्डिंग केले. त्यानंतर पोलिसांनी त्या प्रवाशाच्या सामानाची तपासणी केली असता त्याच्या बॅगेत कोणतीही स्फोटक वस्तू आढळून आली नाही. 

शुक्रवारी मध्यरात्री १२ वाजून ७ मिनिटांनी पुण्याहून दिल्लीकरिता अकासा कंपनीच्या विमानाने उड्डाण केले. त्यावेळी त्या विमानामध्ये १८५ प्रवासी व ६ केबिन कर्मचारी होती. ज्या प्रवाशाने बॉम्बची धमकी दिली होती, त्याच्यासोबत त्याचा एक नातेवाईकही प्रवास करत होता. संबंधित प्रवाशाने छातीत दुखत असल्यामुळे औषध घेतले होते. त्यामुळे तो विचित्रपणे बरळत असल्याचे त्याने सांगितले. 

वैमानिकाने मुंबई हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी संपर्क साधत विमानातील या प्रकाराची माहिती देत आपत्कालीन लॅण्डिंगसाठी परवानगी मागितली. विमान १२ वाजून ४२ मिनिटांनी मुंबई विमानतळावर उतरले. विमान उतरताक्षणी विमानतळावरील सुरक्षेसाठी तैनात केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाच्या जवानांनी विमानाकडे धाव घेतली. मुंबई पोलिसांच्या बॉम्बशोधक पथकालाही याची सूचना दिली. रात्री अडीचदरम्यान बॉम्बशोधक पथकाने तपासणी करत विमानामध्ये बॉम्ब अथवा कोणताही स्फोटक पदार्थ नसल्याचा निर्वाळा दिला.

 

Web Title: bomb in my bag akasa plane had to make an emergency landing in mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.