मनोज गडनीस, मुंबई: मुंबईतूनवाराणसी येथे जाणाऱ्या अकासा विमान कंपनीच्या विमानामध्ये बॉम्ब असल्याचा फोन एअर ट्रॅफिक कन्ट्रोलला (एटीसी) आल्यानंतर मुंबई विमानतळावर शुक्रवारी काहीवेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. कारण विमानाने वाराणसीच्या दिशेने उड्डाण केल्यानंतर हा धमकीचा फोन आल्यामुळे तणाव निर्माण झाला होती.
प्राप्त माहितीनुसार, एटीसीला या विमानात बॉम्ब ठेवल्याचा फोन आल्यानंतर एटीसीने तातडीने संबंधित विमानाशी संपर्क साधत वैमानिकाला या संदर्भात सावध केले. अशावेळी जी काही सुरक्षा घ्यायची असते त्या सर्व सुरक्षा नियमांचे पालन करत वैमानिकाने वाराणसी विमानतळावर विमान उतरवले. त्यानंतर सर्व प्रवासी, वैमानिक व विमानातील कर्मचारी बाहेर पडले. त्यानंतर विमानाची सखोल तपासणी केली असता विमानात कोणताही बॉम्ब आढळला नाही व विमान सुरक्षित असल्याचे आढळून आल्याची माहिती आहे.